दापोली, दि. २० : रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा कुटुंबातील कलहाने थरारक वळण घेतले असून, दापोली तालुक्यातील उन्हवरे गावात मोठ्या भावाने लहान भावाचा फरशीने डोक्यात घालून खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. मृताचे नाव विनोद गणपत तांबे (वय ३६) असून, आरोपी रवींद्र गणपत तांबे (वय ४२) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघे सख्खे भाऊ आपल्या आईसोबत उन्हवरे येथील बौद्धवाडीत राहत होते. आरोपी रवींद्र याची पत्नी बऱ्याच वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती. शनिवारी रात्री घरात काही नातेवाईकांसोबत बसलेल्या चर्चेदरम्यान विनोद याने रवींद्रला अपशब्द वापरले. या अपमानाचा राग मनात धरून दोघांमध्ये वाद झाला. वादाच्या भरात रवींद्रने अचानक फरशी उचलून विनोदच्या डोक्यात घातली. जोरदार प्रहार झाल्याने विनोद जागीच गतप्राण झाला.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरसकर, चिपळूण विभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होऊन पुरावे गोळा करत आहे. संशयित आरोपी रवींद्र तांबे याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
कुटुंबीय आणि नातेवाईकांसमोरच घडलेली ही घटना पाहून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. एक क्षुल्लक वाद इतका टोकाचा निघेल, याची कुणालाच कल्पना नव्हती. सख्ख्या भावाने असा क्रूर निर्णय घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.