जी. एम. शेट्ये हायस्कूल बसणीला उद्योजक गौरांग आगाशे यांच्याकडून संगणक भेट

रत्नागिरी, दि. २३ (प्रतिनिधी) :  २३ जुलै २०२५ रोजी बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित जी. एम. शेट्ये हायस्कूल, बसणी या प्रशालेस उद्योजक श्री. गौरांग आगाशे यांच्या वतीने दोन संगणक भेट देण्यात आले. ही मदत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष सावंत यांच्या पुढाकाराने घडून आली असून, डिजिटल शिक्षणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॅड. अविनाश (भाऊ) शेट्ये, उपाध्यक्ष श्री. मोहन धांगडे, खजिनदार श्री. बंधू मयेकर, कार्यकारिणी सदस्य श्री. प्रसाद (बापू) गवाणकर, दाते श्री. गौरांग आगाशे, श्री. संतोष सावंत, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग नाईक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात दोन्ही मान्यवर पाहुण्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्री. गौरांग आगाशे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना सांगितले, “उद्दिष्ट ठेवून प्रामाणिकपणे चालत राहा, जमिनीवर पाय ठेवा, आणि शाळेला कधीही विसरू नका.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. बापू गवाणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अध्यक्षीय भाषणात श्री. भाऊ शेट्ये यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेत “शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे,” असे ठाम मत व्यक्त केले.

मुख्याध्यापक श्री. नाईक यांनी आभार प्रदर्शन करताना संगणक भेट ही शाळा डिजिटल बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाची मदत असल्याचे सांगितले. तसेच, येणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९०% पेक्षा जास्त गुण मिळवण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सौ. पंडित मॅडम यांनी कार्यक्रमाचे देखणे सूत्रसंचालन केले, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी फलक लेखनाचे कार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली होती.

हा उपक्रम केवळ संगणक भेट देण्यापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणारा ठरला आहे.

आणखी वाचा