मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) : अयोध्येतील रामजन्मभूमि मंदिर निर्माणासाठी देशातील समस्त रामभक्तांनी कारसेवक बनून संघर्ष केला. या संपूर्ण लढ्यात आणि विवादास्पद ढाॅंचा उद्ध्वस्त करण्यात शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार डॉ मनोहर जोशी, सुभाष देसाई यांच्या सह असंख्य शिवसैनिकांनी अयोध्येत धडक दिली आणि बाबरी मशिदीच्या जागेवरील वादग्रस्त ढाॅंचा धराशायी केला. लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल, साध्वी ऋतंभरा उमा भारती आदींनी यात सहभाग घेतला. परंतु बाबरी मशिदीच्या घुमटांवर चढलेल्या मराठमोळ्या शिवसैनिक कारसेवकांना रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते प्रयत्न करीत होते. ते कडवे रामभक्त ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. प्रमोद महाजन यांनीही प्रयत्न केला पण बाबरीचा विवादास्पद ढाॅंचा उद्ध्वस्त केल्यानंतर आणि त्या ठिकाणी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर हे कारसेवक परतीच्या प्रवासाला निघाले. मिलट्रीच्या जवानांनी बेछूट लाठीमार केला. मी, विजय दारुवाले, सोनी (दिगंबर) कांडरकर, नंदकुमार मोरे अयोध्येहून फैजाबाद आणि तिथून दिल्ली गाठून कर्फ्यु च्या वातावरणात तसेच कांडरकरांसह दोन कारसेवक अचानक आजारी पडले त्यांना सांभाळून मुंबई गाठली. प्रचंड प्रमाणात लाठ्याकाठ्या खात अयोध्येतून परतलो परंतु मनात शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाचे पालन केल्याचे व बाबरी ध्वस्त करुन रामल्लाची प्रतिष्ठापना करण्याचे समाधान होते, अशा शब्दांत शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी आपला अनुभव कथन केला. शिवसेना शाखाप्रमुख अशोक परब यांच्या संकल्पनेतून शिवसेना शाखा क्रमांक १४ आणि ग्राहक संरक्षण कक्ष, उत्तर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली पूर्व येथील वैश्य समाज सभागृहात कारसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्वनाथ नेरुरकर आणि नंदकुमार मोरे यांनी ५ आणि ६ डिसेंबर १९९२ चे अयोध्येतील अंगावर शहारे आणणारे अनुभव कथन केले. शिवसेना उपनेते, माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या हस्ते सामना चे तत्कालीन मुख्य उपसंपादक संजय डहाळे, विश्वनाथ नेरुरकर, नंदकुमार मोरे यांना सन्मानित करण्यात आले. अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाॅंचा उद्ध्वस्त झाला. देशात दंगल उसळली. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदरसिंह भंडारी यांनी हात वर केले. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकच आवाज दिला की बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. या संपूर्ण कालखंडात संजय डहाळे यांनी बजावलेल्या कामगिरी बद्दल त्यांना लखनौच्या न्यायालयात हजर राहण्यासाठी सीबीआयने समन्स बजावले होते. याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. अशोक परब, निलेश माळी यांनी त्या घटनेची एक माहितीपूर्ण चित्रफीत तयार केली आहे. या चित्रफितीत मीरज येथील कट्टर शिवसैनिक सुरेश शेळके यांनी सांगितलेले अंगावर काटा उभे राहणारे प्रसंग दाखविण्यात आले आहेत. ही चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येत जाण्यासाठी विश्वनाथ नेरुरकर यांना दिलेल्या ऐतिहासिक पत्राचे वाचन शाखाप्रमुख अशोक परब यांनी केले. सामना आणि नवाकाळ यांच्या ६ डिसेंबर १९९२ च्या संपूर्ण घटनेचा वृत्तांत प्रसिद्ध केलेल्या अंकाची मोठ्या आकारातील पाने याठिकाणी लावण्यात आली होती. ही चित्रफीत केवळ शिवसैनिकांसमोर नव्हे तर जनतेसमोर दाखवून भारतीय जनता पक्षाच्या ढोंगाचा बुरखा फाडणे आवश्यक आहे, असे विनोद घोसाळकर यांनी ठणकावून सांगितले. यावेळी सर्वच स्तरातील मान्यवर उपस्थित होते.








