नवी दिल्ली, दि. २५ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) नेतृत्वाखाली शुक्रवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते आंदोलनासाठी दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना बॅरिकेड्सजवळ रोखत अनेकांना ताब्यात घेतले.
आंदोलनादरम्यान राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव, वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज, ‘आयसा’च्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्यासह ४० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. आंदोलकांना जंतर-मंतरच्या निर्धारित आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत अलीकडे प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.
आंदोलनात आरजेडीचे खासदार मनोज झा, सीपीआय(एमएल) लिबरेशनचे नेते दिपांकर भट्टाचार्य, प्रशांत भूषण, अंजली भारद्वाज आणि नंदिता नारायण यांच्यासह विविध सामाजिक व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
पोलिसांकडून बॅरिकेडिंग
आंदोलक जंतर-मंतरकडे पोहोचताच पोलिसांनी परिसरात बॅरिकेडिंग केली. आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. या कारवाईदरम्यान आंदोलकांना फरफटत नेल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसकडूनही विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले, तर काही ठिकाणी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात आल्याचे वृत्त आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’नेही ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिल्याचे सांगण्यात आले आहे. या संघटनेने ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांची मुदत दिल्याचा दावा करण्यात आला आहे.








