मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या प्रचार मोहिमेला वेग देत चाळीस प्रमुख नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. या यादीत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांना अग्रक्रम देत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वरिष्ठ नेते विनोद तावडे, श्री. शिव प्रकाश जी, अशोक चव्हाण, पीयूष गोयल आणि सुधीर मुनगंटीवार यांचाही या यादीत समावेश आहे. त्याचबरोबर मत्स्य व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचंही नाव स्टार प्रचारकांमध्ये झळकत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही प्रचारकांची यादी जाहीर केली असून, राज्यातील सर्व भागांत उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी या नेत्यांवर असेल. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ‘मिशन विजय’चा नारा देत संघटन पातळीवर कार्यकर्त्यांना सज्ज केलं आहे.
या प्रचारक यादीत मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, रावसाहेब दानवे, आ. आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, छ. शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, मेघना बोर्डीकर, अमर साबळे, अतुल सावे, अशोक उईके, चित्रा वाघ, रक्षा खडसे, प्रवीण डेरेकर, डॉ. भगवत कराड, गोपीचंद पडळकर, डॉ. संजय कुटे, अमित साटम, धनंजय महाडिक, माधवी नाईक, रंधीर सावरकर, अशोक नेते, मंगेश चव्हाण, प्रसाद लाड, इद्रिस मुल्तानी अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या स्टार प्रचारकांच्या माध्यमातून भाजप राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपली प्रचार लाट निर्माण करण्याच्या तयारीत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी पक्षाने सर्वतोपरी मोर्चेबांधणी केली आहे.








