देवरुख नगरपंचायत तर्फे २२ जानेवारीला देवरुखमध्ये भव्य कार्यक्रमांचे आयोजन

संगमेश्वर, दि. २० (प्रतिनिधी): अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला पूर्ण एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

मंदिर सफाई अभियान, शहरी तसेच ग्रामीण भागातील डीप क्लिनिंग ड्राईव्ह, महिला सशक्तीकरण उपक्रम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि पीएम जनमन अभियानाबाबत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी बैठक घेऊन संपूर्ण जिल्हयातील ग्रामपंचायत व नगरपालिका कार्यक्षेत्रात हा कार्यक्रम सर्व नागरीकांना सोबत घेवून साजरा करणेकरीता लोकांना प्रेरीत करणेत यावा असे सुचित केले आहे. तसेच जिल्ह्यातील मंदिरांवर २१ व २२ जानेवारीला विद्युत रोषणाई करावी, अशी सूचना त्यांनी दिली होती.

त्याचपार्श्वभुमीवर देवरुख नगरपंचायतीने मंदीरांचे विश्वस्त, शालेय मुले व नगरपंचायत कर्मचारी यांचेकडून शहरातील सर्व मंदीरांची स्वच्छता केली आहे. तसेच अयोध्येमधील श्रीरामप्रभूंच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्व नागरीकांना दाखविण्याची सोय नगरपंचायतीकडून श्रीरघुपती मंदीर, रामआळी येथे सकाळी ठिक ११.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत करणेत येणार आहे. त्याचप्रमाणे शहरात सर्वांनी गुढया उभाराव्यात व भागवत धर्माचा ध्वज फडकवणेत यावे, सर्व मंदीरांमध्ये प्राणप्रतिष्ठा मुहुर्ताचेवेळी (१२.३९.०० ते १२.४०.२३ या वेळी) घंटानाद व शंखनाद करणेत यावा, मंदीरांना आकर्षक विदयुत रोषणाई करणेत यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नगरपंचायत देवरुख कार्यक्षेत्रातील सर्व मंदीरांच्या विश्वस्तांशी नगरपंचायत प्रशासकांनी घेतलेल्या आढाव्यानुसार पुढील कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे-
* ग्रामदेवी श्रीसोळजाई मंदिर येथे सकाळी ११.३० ते १२.४५ या वेळेत रामरक्षा पठण, घंटा नाद, प्रसाद आयोजित करण्यात आले आहे.
* श्रीरघुपती मंदीर रामआळी येथे सकाळी ०७.०० वाजता षोडषचार पुजा, रामनामजप, सकाळी ठिक ११.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा थेट प्रक्षेपण, दुपारी १२.३९.०० ते १२.४०.२३ या वेळेत घंटानाद व शंखनाद, दुपारी सुश्राव्य भजन, शहरातून सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत शोभायात्रेचे आगमन व सायंकाळी ०७.०० वाजता महाआरती, त्रिपुर, भोवती, छबिना व प्रसाद वाटप करणेत येणार आहे. वेदपाठशाळा येथे सकाळी आठ ते दहा या वेळेत पवनसोक्त अभिषेक, घंटा नाद तसेच सायंकाळी पाच ते सात या वेळात रामरक्षा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
* विठ्ठल मंदिर देवरुख येथे सायंकाळी चार ते सहा या वेळात कारसेवकांचा सत्कार व रामरक्षा पठण आयोजित करण्यात आले आहे.
* दीनोदय वस्तू भांडार समोरील श्रीराम मंदिरामध्ये घंटा नाद, रामरक्षा पठण व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
* मधली आळी देवरुख येथे सायंकाळी चार ते पाच या वेळेत कारसेवकांचा सत्कार त्याचबरोबर भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा मधलीआळी येथून मातृमंदिर चौक, शिवाजी चौक, माणिकचौक मार्गे रघुपती मंदिर येथे जाणार आहे. शहरातील सर्व मंदिरांमधून भाविक या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.
* शहरातील जास्तीत जास्त नागरीकांनी सदरच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन नगरपंचायत व सर्व मंदीरांचे विश्वस्त यांचेवतीने करण्यात येत आहे.

आणखी वाचा