देवरुख, दि. ३ : अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात शेवटच्या निर्णायक चढाईत बोनस गुण मिळवत संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दादासाहेब सरफरे विद्यालय, शिवणे-बुरंबीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने बलाढ्य रत्नागिरी संघावर मात करत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या शानदार कामगिरीमुळे सरफरे विद्यालयाच्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अथर्व गेल्येच्या धडाकेबाज चढाया, तसेच रुद्र बोथले आणि यश पड्याळ यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सरफरे विद्यालयाच्या संघाने शेवटच्या क्षणी सामन्याचे चित्र पालटत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पहिल्या उपांत्य सामन्यात दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या संघाने गतवर्षीच्या विजेत्या दापोली संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात रत्नागिरी संघाने खेड संघावर मात करत अंतिम सामन्यात धडक मारली.
अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच रत्नागिरी संघाने सरफरे विद्यालयाच्या संघावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरानंतर अथर्व गेल्येच्या आक्रमक आणि यशस्वी चढायांमुळे सरफरे संघाने सामन्यात पुनरागमन करण्यास सुरुवात केली. मात्र सामना संपण्यास अवघी पाच मिनिटे शिल्लक असताना रत्नागिरी संघाकडे तब्बल दहा गुणांची आघाडी होती. त्यामुळे सामना रत्नागिरीच्या बाजूने झुकणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
याच निर्णायक क्षणी अथर्व गेल्ये, रुद्र बोथले आणि यश पड्याळ यांनी आपल्या खेळाची पातळी उंचावत जोरदार प्रतिकार केला. सरफरे संघाने शेवटच्या पाच मिनिटांत रत्नागिरी संघावर लोण चढवत सामन्यात जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर सामना शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत रंगतदार आणि निर्णायक स्थितीत राहिला.
सामना बरोबरीत असताना सरफरे विद्यालयाच्या संघाकडे शेवटची चढाई होती. अशा परिस्थितीत प्रशिक्षक शिक्षक सुहास पाब्ये यांनी अथर्व गेल्येला महत्त्वाचा कानमंत्र दिला. सामना बरोबरीत सोडणे संघासाठी अडचणीचे ठरू शकत होते. त्यामुळे शेवटच्या चढाईत संयमाने वेळ काढून योग्य क्षणी गुण मिळविण्याची रणनीती आखण्यात आली.
अथर्वने प्रशिक्षकांच्या सूचना अचूकपणे अंमलात आणल्या. शेवटच्या चढाईत सुरुवातीचे १२ ते १५ सेकंद शांतपणे वेळ काढल्यानंतर योग्य क्षणी वेग घेत बोनस गुण मिळवला. अथर्वच्या या निर्णायक बोनस गुणामुळे सरफरे विद्यालयाच्या संघाने रत्नागिरीवर विजय मिळवत जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले.
रत्नागिरी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सरफरे विद्यालयाच्या या उल्लेखनीय विजयाबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांचे बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद तसेच तालुक्यातील क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन होत आहे.
या यशामुळे सरफरे विद्यालयाच्या संघाची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, आगामी सामन्यांसाठी संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.








