गुहागर, दि. ८ : भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी झोंबडी ग्रामपंचायतीने जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य दिले असून, ग्रामस्थांच्या श्रमदानातून झोंबडी नदीपात्रात बंधारे उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यंदा राज्यातील अनेक भागांत पावसाची कमतरता जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन झोंबडी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर यांच्या पुढाकारातून ६ ऑक्टोबर रोजी शैक्षणिक व विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. आगामी काळातील पाणीप्रश्नाचा सामना करण्यासाठी नदीपात्रातील योग्य ठिकाणी बंधारे उभारण्याबाबत नियोजन करण्यात आले.
या नियोजनाची तातडीने अंमलबजावणी करत ८ ऑक्टोबर रोजी झोंबडी नदीपात्रात बंधारे उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत झोंबडी तेलीवाडीतील ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत श्रमदान केले. पावसाचे पाणी वाहून न जाता नदीपात्रात अडवणे, पाणी जमिनीत मुरवणे, भूजलपातळी वाढवणे आणि आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या जलसंधारणाच्या कामात शंकर लांजेकर, वासुदेव लांजेकर, तुकाराम लांजेकर, प्रभाकर लांजेकर, शशिकांत लांजेकर, विष्णू लांजेकर, विकास पवार, दत्तुराम पवार, महेश लांजेकर, गणेश लांजेकर, ग्रामसेवक दीपक गायकवाड तसेच सरपंच अतुल लांजेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून जलसंधारण करण्याचा आदर्श निर्माण झाला आहे.
नदीपात्रातील आवश्यक ठिकाणी भविष्यातही बंधारे उभारून पाणीसाठा वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. “आज अडवलेले पाणी उद्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरेल,” या उद्देशाने झोंबडी ग्रामस्थांनी सुरू केलेला हा उपक्रम परिसरातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.








