खेड, दि. ०१ (प्रतिनिधी): राज्य मागास आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, मागासलेपण तपासण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.त्याच बरोबर कुणबी समाजाचे ही चुकीच्या पध्दतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे.या सर्वेक्षणाला कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई शाखा खेड यांनी विरोध दर्शविला असून तसे निवेदन ही खेड तहसिलदारांना मार्फत राज्य मागास आयोगाला देण्यासाठी दिले आहे. अशी माहिती खेड शाखेचे अध्यक्ष कृष्ण पांडुरंग आग्रे यांनी दिली आहे.
या सर्व्हेक्षणामध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरुन घेतली जाणार आहे. सर्व्हेक्षणासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करत आहेत. ते मराठा सोडून इतर कुणबी वस्त्यांमधून जाऊन देखील सर्व्हेक्षण करत आहेत. जर सर्व्हेक्षण मराठा समाजासाठी करत आहात, तर इतर समाजाचा सर्व्हेक्षण कशासाठी करता याच उत्तर संबंधित अधिकारी / कर्मचारी देत नाहीत. किमान सर्व्हेक्षण करताना आमची माहिती घेताना आम्हाला हा सर्व्हे कशासाठी करता हे सांगणे अपेक्षित आहे. परंतु ती माहिती कोणताही अधिकारी / कर्मचारी देत नाही. असे निवेदनामध्ये नमुद केले आहे.
सर्व्हेक्षण करताना कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात तिलोरी कुणबी समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाची पोट जात तिलोरी आहे. आपण केलेल्या अॅपमध्ये या समाजाचा सर्व्हेक्षण करण्यासाठी कोणताही कॉलम / रकाना नाही. त्यामुळे आमचा सव्हें कशासाठी व का केला जातोय हे समजून येत नाही. मराठा समाजाची गणना करत असताना सर्व घरा घरामध्ये जावून आमची देखील त्याच पध्दतीने गणना करावी त्यामध्ये आमची हिंदू तिलोरी कुणबी अशी नोंद करून घ्यावी. आमची गणना करत नसाल तर आमचा या सर्व्हेक्षणावर बहिष्कार आहे.
राज्य मागास वर्ग आयोगाकडे ओबीसी समाजाची जनगणना करावी, यासाठी आम्ही कित्येक वर्षे लढे व आंदोलनातून मागणी करीत आहोत. शासन व मागासवर्ग आयोग याकडे नेहमी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आमचा मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्यास विरोध नाही. आपण तो त्यांच्या वाढी वस्त्यामधून जाऊन करावा, परंतु आमच्या तिलोरी कुणबी समाजाची माहिती का व कशासाठी घेतली जात आहे, ती देखील चुकीची घेतली जात असल्याने आमची माहिती देण्यास आमचा विरोध आहे.असे ही निवेदानमध्ये नमुद केले आहे.








