आता २८ दिवसांचा नव्हे तर ३० दिवसांसाठी असणार मोबाईल रिचार्ज

मोबाईल ग्राहकांना दिलासा; केवळ कॉलिंग-एसएमएससाठीही स्वतंत्र प्लॅन उपलब्ध होणार

नवी दिल्ली, दि. २७ : देशभरातील प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी रिचार्जच्या वैधतेसंदर्भात महत्त्वाचा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) ग्राहकांसाठी ३० दिवसांच्या वैधतेचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्यासंदर्भातील नियम लागू केले आहेत. त्यामुळे २८ दिवसांच्या प्लॅनमुळे वर्षातून १३ वेळा रिचार्ज करण्याची वेळ येणाऱ्या ग्राहकांना आता ३० दिवसांच्या वैधतेचा पर्याय मिळणार आहे.

‘टेलिकॉम कन्झ्युमर्स प्रोटेक्शन रेग्युलेशन्स’नुसार, दूरसंचार कंपन्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देणारे स्पेशल टॅरिफ वाउचर्स (STVs) उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्लॅनची वैधता ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी असू शकते. तसेच दर महिन्याला एकाच तारखेला नूतनीकरण होणारा पर्यायही ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.

या बदलाचा विशेष फायदा इंटरनेटचा नियमित वापर न करणाऱ्या ग्राहकांना होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक तसेच केवळ कॉलिंग आणि एसएमएससाठी मोबाईलचा वापर करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार प्लॅन निवडण्याचा पर्याय मिळणार आहे.

राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी यापूर्वी संसदेत २८ दिवसांच्या रिचार्ज वैधतेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर या विषयावर नियामक पातळीवर नियमांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

नव्या व्यवस्थेमुळे ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार रिचार्ज प्लॅन निवडता येणार असून, ३० दिवसांच्या वैधतेमुळे रिचार्जच्या वारंवारतेतही बदल होणार आहे.

photo credit- zee business

आणखी वाचा