मुंबईत ठाकरे बंधूंची गर्जना; लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधक एकवटले

राज-उद्धव ठाकरे अन् बाळासाहेब थोरातांचा एकाच गाडीतून प्रवास; निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात तसेच लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईत रविवारी भव्य ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. मेट्रो सिनेमा येथून सुरू झालेला हा मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत नेण्यात आला. मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पक्षासह विविध विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने या मोर्चाची राजकीय चर्चा रंगली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर तसेच मतदार यादीतील विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेवर (एसआयआर) ठाकरे बंधूंनी जोरदार टीका केली. मोर्चानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेतील मतदारसंख्येच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारसंख्येत झालेल्या वाढीचा संदर्भ देत विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार अचानक कसे वाढले, असा सवाल त्यांनी केला.

राज ठाकरे म्हणाले की, २०१७पासून आपण निवडणूक प्रक्रियेत मतांची चोरी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत आहोत. त्यावेळी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांशी याबाबत चर्चा केल्याचा दावाही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारसंख्येत मोठी वाढ कशी झाली, याचे स्पष्टीकरण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. “सत्तेवर कोणाला बसवायचे, हे जनतेने ठरवायचे आहे, निवडणूक आयोगाने नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दोन प्रमुख मागण्या मांडल्या. महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि देशातील मतदान प्रक्रिया ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. एसआयआर ही प्रक्रिया अपवादात्मक परिस्थितीतच करता येते, असा माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांच्या मताचा संदर्भ देत संपूर्ण देशात अशी प्रक्रिया राबविण्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मोठ्या नैसर्गिक आपत्ती, मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर किंवा दुबार मतदारांसंबंधी गंभीर परिस्थिती अशा अपवादात्मक कारणांसाठीच ही प्रक्रिया असावी, असा दावा त्यांनी केला.

“आतापर्यंत झालेला एसआयआर रद्द झाला पाहिजे. तसेच देशातील मतदान ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर झाले पाहिजे. या दोन गोष्टी झाल्या तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,” असे राज ठाकरे म्हणाले. उद्या कोणाचीही सत्ता आली तरी आपल्याला त्याचा आक्षेप नसून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि भाजपवर आक्रमक शब्दांत टीका केली. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत पूर्वी सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांचा समावेश होता; मात्र आता या प्रक्रियेत बदल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी “ज्ञानेश कुमार नव्हे, अडानी कुमार” असा खोचक टोला लगावला. निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांचा प्रभाव असल्याचा आरोप करत त्यांनी मतदारांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जात असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी हा लढा लोकशाही आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारासाठी असल्याचे सांगितले. “मतदारांचा अधिकार हिरावून घेणार असाल तर आता पाऊल उचलले आहे,” असा इशाराही त्यांनी दिला. लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याचा आरोप करत हा लढा देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील शेतकरी संकट, महिलांवरील अत्याचार, कायदा-सुव्यवस्था आणि विरोधी पक्ष फोडण्याच्या राजकारणावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाण्यातील हत्या प्रकरणाचा संदर्भ देत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब, संतोष शिंदे तसेच मनसेचे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यावर होती. मार्गावर कार्यकर्त्यांना शिस्तबद्धपणे मार्गस्थ करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

ठाकरे बंधूंनी सर्व विरोधी पक्षांना पक्षीय झेंडे न घेता मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पक्षासह विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. राज आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त उपस्थिती, विविध विरोधी पक्षांचा सहभाग आणि निवडणूक आयोगाविरोधातील आक्रमक भूमिका यामुळे मुंबईतील या ‘गर्जना मोर्चा’कडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधले गेले.

आणखी वाचा