
कडवई, दि. १४ : प्रलंबित मानधनासह विविध न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संगमेश्वर तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने ५ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासनाने तातडीने मागण्यांबाबत लेखी व समाधानकारक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली असून, आंदोलनामुळे तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (मनरेगा) कामे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ग्रामरोजगार सहाय्यक ग्रामपंचायत स्तरावर मनरेगा, घरकुल योजना, फळबाग लागवड यांसह विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पार पाडतात. मात्र, कामाच्या तुलनेत मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे असून, ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष क्षेत्रीय कामांसाठी अनेकदा स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची पूर्तता होत नसल्याने संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
मानधन आणि विमा संरक्षणाची मागणी
संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार मानधनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे, मानधन कोणत्याही विलंबाशिवाय थेट वैयक्तिक बँक खात्यात जमा करणे आणि क्षेत्रीय काम करणाऱ्या सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांना शासकीय विमा संरक्षण लागू करणे यांचा समावेश आहे.
सरपंच, ग्रामसेवकांना सहकार्याचे आवाहन
हे आंदोलन कोणत्याही स्थानिक अधिकारी किंवा व्यक्तीविरोधात नसून, न्याय्य हक्कांसाठी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाकडून लेखी व समाधानकारक निर्णय होईपर्यंत मनरेगा, घरकुल आणि फळबाग लागवड यांसह संबंधित कामांचे मस्टर काढू नयेत, अशी विनंतीही संघटनेने केली आहे. मागण्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण विकासकामांवर या आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.








