चिपळूण, दि. १४ (अंकुश कदम): रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाचा बदल घडवून आणणारी घोषणा आज चिपळूणमधून झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते प्रशांत बबन यादव यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, याची अधिकृत घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.
नितेश राणे यांनी प्रशांत यादवांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की, “प्रशांत यादव हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रभावी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. कार्यकर्ता म्हणून नव्हे तर नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला, अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कामही उल्लेखनीय आहे. अशा प्रकारचा नेता भाजपमध्ये आल्यास संघटनेला निश्चितच मोठा फायदा होईल.”
या प्रवेश सोहळ्याची औपचारिकता येत्या १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पार पडणार आहे. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्यासह राज्य व जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील तसेच ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्ते देखील या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे चिपळूण भाजपमध्ये सध्या उत्साह आणि हलचालींची नवी लाट उसळली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे मतदारसंघातील ज्येष्ठ मंत्री आहेत आणि प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र, प्रशांत यादव यांनी आपली राजकीय योग्यता आणि भावी दिशा पाहून हा निर्णय घेतला आहे. १९ ऑगस्टचा सोहळा हा फक्त प्रवेशाचा कार्यक्रम न राहता संघटनेच्या बळकटीकरणाचा क्षण ठरेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
निवडणुकीतील त्यांच्या ताकदीबाबत बोलताना नितेश राणे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील निकालाची आठवण करून दिली. त्या वेळी प्रशांत यादव केवळ सहा हजार आठशे मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकीत भाजप नक्कीच विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, नेते राजेश सावंत, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह भाजप पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील तसेच जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रशांत यादवांच्या प्रवेशामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, १९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या या सोहळ्यासाठी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे. हा प्रवेश सोहळा चिपळूणच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा सुरू झाली
