रत्नागिरी, दि. ०४ : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची कन्या तन्वी कोलते हिने कलर्स मराठीवरील लोकप्रिय ‘बिग बॉस मराठी’ या रियालिटी शोमध्ये दमदार कामगिरी करत रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राज्यभर गाजवले आहे. आपल्या आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे तन्वीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली असून, आता तिला विजेतेपदापर्यंत पोहोचवण्यासाठी कोकणभरातून पाठिंबा मिळत आहे.
तन्वी कोलते ही मूळ साखरपा, संगमेश्वर परिसरातील रहिवासी असून, तिने ‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक टास्कमध्ये खंबीर भूमिका घेतली आहे. कठीण प्रसंगातही न डगमगता तिने आपले मत ठामपणे मांडले. तिच्या स्वभावातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि खेळातील सातत्य यामुळे ती इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरली आहे.
सध्या ‘आपली मुलगी, आपला अभिमान’ या भावनेतून रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात तन्वीला भरघोस मतदान करण्याचे आवाहन होत आहे. सोशल मीडियावरही तिच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात मोहिम राबवली जात असून, अनेक तरुण-तरुणी, स्थानिक मंडळे आणि चाहतावर्ग सक्रिय झाले आहेत.
दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी तसेच जिओ हॉटस्टारवर प्रसारित हो
णाऱ्या या कार्यक्रमात तन्वीचा प्रवास सातत्याने चर्चेत राहिला आहे. तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, अंतिम फेरीत तिचा विजय निश्चित असल्याचा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
रत्नागिरीच्या मातीतील या गुणी लेकीने मोठ्या व्यासपीठावर आपली छाप उमटवली आहे. त्यामुळे तिला विजयी करण्यासाठी सर्व रत्नागिरीकरांनी आणि कोकणवासियांनी एकजुटीने मतदान करून साथ द्यावी, असे आवाहन विविध स्तरांतून करण्यात येत आहे.
https://www.instagram.com/tanvikolteofficial?igsh=a20xeDZmbml2eTF2








