राज्यात उन्हाचा कडाका वाढला; ऑक्टोबर हिट आणखी तीव्र होणार

कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा; मुंबईसह अनेक भागांत तापमानात वाढ

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्रातील बहुतांश भागातून मान्सूनने माघार घेतल्यानंतर राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मुंबईसह कोकणात पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांतही येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून परतण्याची शक्यता असून, त्यानंतर उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

५ ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची शक्यता असून, या भागांसाठी पिवळा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस कोकणात उकाडा आणि उन्हाची तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे.

मुंबईत रविवारी कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा २.५ अंशांनी अधिक असल्याने दुपारच्या वेळी मुंबईकरांना उन्हाचा चटका जाणवत आहे. विदर्भातही ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत असून अकोला येथे ३६.१ अंश तापमानाची नोंद झाली. अमरावती आणि चंद्रपूर येथे ३६.४, वर्धा ३६, बुलढाणा व ब्रह्मपुरी ३५.२, नागपूर आणि वाशिम येथे ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

यंदा कोकणातील पावसाचे प्रमाण असमान राहिले आहे. उत्तर कोकणात सरासरीच्या आसपास पाऊस झाला असला तरी रत्नागिरीतील काही भागांसह सिंधुदुर्गातील बहुतांश भागात पाऊस कमी झाला. पावसात मोठा खंड पडल्याने सध्या अनेक भागांत कोरडे हवामान आहे.

दरम्यान, पुणे शहरातही ऑक्टोबर हिटची चाहूल लागली असून कमाल-किमान तापमानात वाढ झाल्याने दिवसाबरोबरच रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाली आहे.

आणखी वाचा