खेरशेतमध्ये ‘वर्षावास’ धम्मसंस्कार सोहळ्यात बुद्ध विचारांचा जागर

बुद्धांचे मौलिक विचार हेच यशस्वी जीवनाचे खरे कानमंत्र : काशीराम कदम

चिपळूण, दि. ६ (प्रतिनिधी) : तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक असून, बुद्ध विचारांचे आचरण केल्यास जीवनात यश व समाधान प्राप्त होऊ शकते, असे प्रतिपादन चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, सावर्डे विभागाचे अध्यक्ष काशीराम कदम गुरुजी यांनी केले.

सावर्डे विभाग व खेरशेत शाखेच्या संयुक्त विद्यमाने खेरशेत येथील तक्षशिला बुद्ध विहारात रविवारी (दि. ४ ऑक्टोबर) ‘वर्षावास’ व धम्मसंस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धम्ममय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून काशीराम कदम बोलत होते.

यावेळी संस्थेचे मुंबई मुख्य कमिटी अध्यक्ष विठोबा पवार यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणांना उद्योजक बनविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून रोजगाराभिमुख विविध उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक तालुका कमिटी अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी “संघटन हेच संस्थेच्या यशाचे गमक आहे,” असे सांगत उत्तम संघटनामुळे संस्था प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले. संस्थेने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नावलौकिक मिळविल्याचेही त्यांनी सांगितले.

स्थानिक तालुका सरचिटणीस संदेश पवार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे महत्त्व विशद केले. या प्रतिज्ञांचे आचरण केल्यास समाजाच्या कल्याणाला हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले.

मिरजोळी दलवाई हायस्कूलचे मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथावर विवेचन केले. आधुनिक काळात पंचशील तसेच भगवान बुद्धांनी दिलेल्या विज्ञानवादी अष्टांगिक मार्गाचे आचरण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी धम्मध्वजारोहण, दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बौद्ध उपासक सुभाष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मसंस्कार पार पडले. सावर्डे विभागाचे सरचिटणीस संतोष पवार यांनी प्रास्ताविक केले. खेरशेत शाखेचे माजी सरचिटणीस मिलिंद कदम यांनी सूत्रसंचालन केले. अभिजीत संजय कदम याने स्वलिखित बुद्ध धम्मावरील कविता सादर केली.

यावेळी संस्थेचे मुंबई मुख्य कमिटी कार्याध्यक्ष शांताराम गमरे, खजिनदार राहुल पवार, तालुका कमिटी सहचिटणीस प्रमोद धमकमिटी अध्यक्ष मनोहर कदम, राजहंस पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन जगदीश कांबळे, खजिनदार संतोष सावंत, न्यायदान कमिटी अध्यक्ष आनंदा सकपाळ, आरपीआय (आठवले) तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सचिव उमेश सपकाळ, युवक जिल्हाध्यक्ष अॅड. प्रशितोष कदम, तसेच विविध पदाधिकारी, महिला संघटनेच्या पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेरशेत शाखेचे अध्यक्ष विजय कदम, माजी अध्यक्ष सुनील कदम, धम्मभूषण विकास संघाचे मुंबई अध्यक्ष अनिल कदम, खेरशेत यशोधरा महिला मंडळाच्या प्रज्ञा कदम, संगमित्रा कदम, मनाली कदम, संघरक्षता कदम यांच्यासह सावर्डे विभाग व खेरशेत शाखेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

आणखी वाचा