रत्नागिरी, दि. २१ (प्रतिनिधी) : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचा चैत्र नववर्ष पाडवा मेळावा नुकताच झाला. या वेळी विविध क्षेत्रात उत्तम काम केलेल्या व्यक्तींचा मंडळातर्फे सत्कार, वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्ञाती बांधवांचा सत्कार, ज्यांच्या विवाह सहजीवनाची ५० वर्ष पूर्ण झाली आहे अशा दांपत्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवाजीनगर येथील व्यसनमुक्त शंकर गोविंद थोटम यांचाही गौरव केला. ते पूर्णपणे व्यसनमुक्त असून त्यांनी बाळ सत्याधारी महाराज यांची दीक्षा घेऊन व्यसनमुक्त झाले. ते आता प्लंबिंगचा व्यवसाय उत्तम तऱ्हेने सांभाळत आहेत. गेले आठ वर्ष ते पूर्णपणे व्यसनमुक्त आहेत. त्यांच्या दोन मुलांसहित त्यांचा उत्तम असा व्यवसाय करत आहे. त्यांचा मंडळाने सत्कार केला.नक्षत्र उद्यान उभारणी व औषधी वनस्पतींचे अभ्यासक, जवळपास २०० वनस्पतींची जपणूक करणाऱ्या विनायक बापट यांनाही गौरवले. ते वनस्पती नुसत्या खोडावरून ओळखतात. वीज मंडळ ग्राहक मंच आणि वीज नियामक आयोगावर कार्यरत जयंत बिवलकर यांनाही सन्मानित केले. अनेक प्रकारच्या तक्रारींचं त्यांनी निराकरण अतिशय उत्तमपणे केले आहे. आज 400 समाधानी ग्राहक ज्यांच्यामुळे त्यांचा लाखो रुपयांचा फायदा झाला आहे. त्याचबरोबर नाटककार, साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांना लेखनाबद्दल आणि अमृतवेल नाटकाला संगीत नाट्य स्पर्धेत लेखनासाठी राज्य शासनाचे बक्षीस मिळाल्याबद्दल सन्मान केला. पाककला कृती स्पर्धेच्या विजेत्या सौ. अदिती भावे, संस्कृत व्याकरण पुस्तकासाठी सौ. दीप्ती आगाशे व अनेक मुलांना व भगिनींना अशा अनेक लोकांचा सत्कार केला.
मंडळ अनेक प्रकारचे उत्सव आणि सामाजिक बांधिलकी ठेवून कार्यक्रम करत आहे. परिसरातील भगिनींसाठी चैत्र हळदीकुंकू समारंभही झाला. यात जवळपास सर्व समाजातील 250 भगिनी उपस्थित होत्या. त्यानंतर सखी ग्रुप प्रस्तुत मंगळागौर हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार कार्यक्रम झाला. यामध्ये सर्व भगिनी मंडळाच्या सहभागी झाल्या. सौ. सौख्यदा वैशंपायन व सौ. नीलिमा केळकर यांनी भरतनाट्यमचा आविष्कार सादर केला. चहापान आणि देवीचा प्रसाद आंबे डाळ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुडाळ येथे ग्राहक मंचाचे पदाधिकारी, अधिवक्ता योगेश खाडीलकर यांनी भूषविले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे, कार्यवाह रवींद्र रानडे, खजिनदार विलास कुलकर्णी, कार्याध्यक्ष श्री. देशकुलकर्णी, उपाध्यक्ष रवींद्र इनामदार, सौ. तेजा मुळे, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. मंडळाने आता नवीन इमारत बांधण्याचा संकल्प केला असून त्यापैकी ७० टक्के भाग पूर्ण झालेला आहे.







