सिंधुदुर्ग, दि. २१ : जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील महायुती अखेर तुटली असून ही फूट जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वामुळे नव्हे, तर प्रदेश पातळीवरील एका बाहेरील भाजप नेत्याच्या आदेशानुसार घडल्याचा खळबळजनक आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या राणे घराण्याला कमजोर करण्यासाठीच युतीचा गळा दाबण्यात आला आणि हा खेळ घरातल्या प्रतिस्पर्ध्यांचा नसून बाहेरून घडवून आणलेला आहे, असा जोरदार सूर जिल्ह्यात उमटू लागला आहे.
सिंधुदुर्ग हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याने शिवसेनेपासून काँग्रेसपर्यंत आणि नंतर त्यांच्या स्वाभिमान पक्षापासून भाजपपर्यंत सत्ता अनुभवली. ते शिवसेनेत असताना शिवसेनेचा प्रभाव; काँग्रेसमध्ये गेल्यावर काँग्रेसचे वर्चस्व; स्वतःचा पक्ष स्थापन झाला तेव्हा स्वाभिमानचा ताबा आणि आता भाजपमध्ये असतानाही जिल्ह्यावर राणेंचे वर्चस्व कायम आहे. हेच वर्चस्व काही मोठ्या बाहेरील नेत्यांना खटकत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.
शिंदे गटाचे तरुण नेते म्हणून ओळख असलेले आमदार निलेश राणे हे नेहमीच सरळ बोलणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. कणकवली दौऱ्यावर बोलताना त्यांनी थेट नाव न घेता भाजपच्या एका बड्या नेत्यावर प्रहार करत, महायुती तोडण्याचा निर्णय जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरून घेण्यात आला असे स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार राणे घराण्यात कोणत्याही पक्षांसोबत संबंध तुटण्यासारखी परिस्थिती नव्हती, पण महापुरुषांविरुद्ध डाव खेळायचा ठरवल्यामुळे निर्णय वरच्या पातळीवरून लादला गेला.
महायुती करण्यासाठी नारायण राणे यांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे आणि निलेश राणे असे सर्वजण एकाच बैठकीत सहभागी झाले होते. प्राथमिक सहमतीही झाली होती. मात्र भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून अचानक ‘युती न करण्याचा’ संदेश दिला गेला आणि थांबूनही अपेक्षित निर्णय न झाल्याने राणे गटाने अखेर वेगळा मार्ग स्वीकारला. राणे यांनी सांगितले की, आम्ही पुरेसा वेळ दिला, अनेक बैठकाही झाल्या, पण समाधानकारक उत्तर आले नाही. कार्यकर्त्यांच्या हितासाठी अखेर निर्णय घ्यावा लागला.
त्यांनी हेही स्पष्ट केले की, ही निवडणूक आमदार-खासदारांची नसून कार्यकर्त्यांची आहे आणि जिथे योग्य व मजबूत उमेदवार असतील तिथेच शिंदे गट पाठिंबा देईल. त्यामुळे आता सिंधुदुर्गातील तीनही नगरपरिषद व नगरपंचायतींच्या लढतीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकमेकांसमोर येणार आहे.
अशा प्रकारे ही महायुती तुटली नाही, तर बाहेरून फोडण्यात आल्याचं चित्र स्वतः निलेश राणे यांनी स्पष्ट केल्याने सिंधुदुर्गातील राजकारणात ‘बाहेरील नेता विरुद्ध राणे घराणे’ अशी नवी लढत पेटण्याची चिन्हे आता ठळकपणे समोर आली आहेत.








