महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून एक प्रश्न सातत्याने चर्चेत आहे, येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार? ही चर्चा केवळ अफवा नाही, तर अनेक सभांमधील हालचाली, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि जनमानसातील उत्सुकता यामुळे ती अधिक गडद झाली आहे. मराठी अस्मिता, मतचोरी, बाळासाहेबांचा वारसा आणि भाजपाविरोधी समीकरण या सर्वांचा संगम या चर्चेत दिसतो.
उद्धव ठाकरेंचे नेतृत्व म्हणजे गोंधळ आणि संधी गमावलेली
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद भूषवले, पण त्यांच्या नेतृत्वावर सतत प्रश्नचिन्ह राहिले. शिंदे गटाच्या बंडामुळे शिवसेना तुटली आणि सत्ता हातातून गेली. कार्यकर्त्यांशी थेट संवादाचा अभाव, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची युती आणि ‘सॉफ्ट’ भूमीका यामुळे पारंपरिक मतदार नाराज झाले. कोविड काळात काही निर्णयांनी त्यांची क्षमता दिसली खरी, पण सातत्याने उशिरा घेतलेले निर्णय आणि संघटनात्मक कमकुवतपणा यामुळे विश्वास कमी झाला. जो माणूस स्वत:चा पक्ष टिकवू शकला नाही, स्वत:सोबत होत असलेले षड्यंत्र ओळखू शकला नाही तो काय राज्य चालवणार, कशी राज्याची आणि महानगरी मुंबईची काळजी घेणार असे चित्र उभे करण्यात आले. मात्र त्याच वेळी पेटून उठून, आक्रमण कर्त्यांवर प्रतिहल्ला करण्याची संधी गमावली अन् कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण केला. जनता, जनतेच्या तर मनात सहानुभूती निश्चित आहे पण नेतृत्त्व म्हणून असणाऱ्या विश्वासाच काय?
राज ठाकरेंचा करिष्मा आहे, पण सातत्य नाही
राज ठाकरे आजही करिझ्मॅटीक वक्ते, राजकारणी म्हणून ओळखले जातात. मराठी भाषेचा मुद्दा, अस्मिता यावर त्यांची भूमिका ठाम आहे. मात्र सातत्याचा अभाव, निवडणुकीतील अपयश आणि धोरणात्मक अस्पष्टता यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली नाही, तर जनतेमधल्या कुण्या राज भक्ताने म्हटले की मनसेलाच मत देणार तर लोक हसतात, विनोद होऊन बसला आहे पक्षाचाही अन् पक्ष प्रमुखांचाही. ज्याचा परिणाम त्यांच्या पुत्राने विधानसभा निवडणुकीत अनुभवलाच आहे.
राज ठाकरे कधी भाजपाच्या बाजूने तर कधी विरोधात, अशा बदलत्या भूमिकांमुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. भाषणात ताकद असूनही कृतीत शून्य राहिल्याने त्यांची प्रतिमा केवळ राजकीय इन्फ्लुएन्सरपर्यंत मर्यादित झाली आहे. इतर राजकीय पक्ष त्यांच्या पायद्यासाठी ‘कॉन्ट्रॅक्ट’ देतात, म्हणजे कार्यक्रमांच्या सुपाऱ्या कशा असतात तशाच. हा मुद्दा घेऊन भाषण करा, मिडियात बोला किंवा महिनाभर कॅम्पेनच राबवा, हेच सुरू आहे राज ठाकरे कधी काय करतील सांगता येत नाही. ते करतील त्या कृतीचा राजकारणातील खेळी पलिकडे समाजकारण, समाजकल्याण याबाबत शून्यच.
राज–उद्धव एकत्र, मराठी जनतेचे स्वप्न
जर दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतदारांचे मोठे कन्सोलिडेशन होऊ शकते. मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या ठिकाणी भाजपा शिंदे गटाला थेट आव्हान मिळेल. ‘बाळासाहेब’ ब्रँड आणि मराठी अस्मिता या भावनिक मुद्द्यांवर जनतेचा मोठा पाठिंबा मिळू शकतो. ओपिनियन पोल्सनुसार मुंबईतील ५२% मतदारांना हे समीकरण पसंत आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले तर मैदानावर उर्जा वाढेल आणि विरोधकांना मोठे आव्हान निर्माण होईल.
पण वास्तव वेगळे, दिवाळी की संक्रांत?
उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली. विरोधक म्हणून रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभे करण्याची क्षमता त्यांनी दाखवली नाही. लोकसभा आणि विधानसभेतही प्रचाराची मोहीम मुळमुळीत दिसली, नुसती भाषण ठोकून आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर प्रचार-प्रसार अपेक्षित नव्हता. त्यानंतर आताही विरोधक म्हणून कामगिरी शून्य.
राज ठाकरे सातत्याने विचार, मते बदलत राहिले. जेव्हा आपल्याला संपवतील की काय अशी भीती वाटल्यावर यांनी वाटाघाटी करत ऐतिहासिक भरत भेट केली. पण काय तोवर जनतेने यांना राजकीय इन्फ्लुएन्सर म्हणून गृहीत धरले. राज यांनी सातत्याने भाषणात ताकद दाखवली पण कृतीत शून्य राहिले. भाजपाने साम–दाम–दंड–भेद या नीतीचा प्रभावी वापर करून विरोधकांना कमजोर केले आहे. त्यामुळे राज–उद्धव युती ही भावनिक दिवाळी वाटली तरी प्रत्यक्षात ती संक्रांत ठरण्याची चिन्हे जास्त आहेत.
खरी कसोटी, महानगरपालिका निवडणुकीत
मुंबई महानगरपालिकेत मराठी टक्का टिकवणे ही शिवसेना–मनसेची खरी परीक्षा असेल. भाजपाची पूर्वतयारी, बूथ स्तरावरील संघटन आणि रणनीती यामुळे विरोधकांना मोठे आव्हान आहे. त्यामुळे विरोधक म्हणून जबाबदारी पार पाडणे हीच खरी कसोटी सर्वांसह सेना-मनसेवर राहिल.
राज–उद्धव एकत्र येणे हे मराठी जनतेसाठी भावनिक क्षण आहे खरा. पण भावनांच्या पलीकडे जाऊन संघटन, धोरणात्मक स्पष्टता आणि सातत्यपूर्ण जनआंदोलन यांची गरज आहे. अन्यथा ही युती दिवाळीचा आनंद न देता संक्रांतीचा गारवा आणेल. महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधक म्हणून जबाबदारी उचलून ती लिलया पेलणे गरजेचे झाले आहे. अन्यथा, मोनॉपॉलीने सर्व त्रस्त होऊ, कोणत्याही क्षेत्रात मोनॉपॉली घातकच.

– दिशा खातू
Freelance Journalist
Mumbai








