दिल्ली स्फोट हा मोठ्या कटाचा भाग; पाकिस्तानकडून देशभर दहशत फैलावण्याचा प्रयत्न – फडणवीस

मुंबई, दि. २२ : 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या 17व्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर तीव्र भूमिका मांडली. या कार्यक्रमात 26/11 च्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना आणि निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाऊंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने बोलताना फडणवीस यांनी अलीकडील दिल्ली स्फोटाचे गांभीर्य स्पष्ट करत तो मोठ्या दहशतवादी कटाचा भाग असल्याचा गंभीर दावा केला.

दिल्लीत झालेल्या स्फोटाला ‘फक्त एक इशारा’ म्हटले जात असताना या स्फोटामागे देशभरात दहशत पसरवण्याचा पाकिस्तानचा कट होता, असे ते म्हणाले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “दिल्लीतील स्फोट ही घटना एकटी नव्हती. पाकिस्तानकडून देशाच्या कानाकोपऱ्यात मोठे बॉम्बस्फोट घडवण्याचा डाव आखण्यात आला होता. मात्र भारताच्या तपास यंत्रणांनी वेळीच मोठी कारवाई करत 3000 किलो आरडीएक्स जप्त केले. जर ते आरडीएक्स हाती आलं नसतं, तर मुंबईसह अनेक महत्त्वाची शहरं आज उद्ध्वस्त झाली असती.”

‘भारत बदलला आहे… दहशतवाद्यांना चुकवणं आता अशक्य’

पाकिस्तान भारताला थेट युद्धात हरवू शकत नाही, हे त्यांना माहिती असल्याने छद्म युद्ध सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले. “पाकिस्तान छुप्या युद्धाने भारतात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी आपल्याला फसवता आलं असतं, पण आजचा भारत बदलला आहे. आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान, चाणाक्ष गुप्तहेर व्यवस्था आणि सक्षम सैन्य आहे,” असेही त्यांनी सांगितले.

फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील स्फोट करणाऱ्या गटाचे मोठे उद्दिष्ट असफल झाल्याने त्यांनी एकच स्फोट घडवून आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. “दहशतवाद्यांचा पूर्ण डाव उधळला गेला, पण त्यांनी एक बॉम्बस्फोट घडवून दाखवलं की आम्ही अजूनही जिवंत आहोत, सक्रिय आहोत,” असे फडणवीस म्हणाले.

26/11 हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर

कार्यक्रमात 26/11 हल्ल्याचा उल्लेख करताना फडणवीस भावुकही झाले. त्यांनी हा हल्ला मुंबई किंवा ताज-ट्रायडेंट हॉटेलवर नसून भारताच्या सार्वभौमत्वावर असल्याचे स्पष्ट केले. “जसा 9/11 हल्ला अमेरिकेच्या गर्वाचा ट्विन टॉवर उद्ध्वस्त करून केला गेला, तसाच 26/11 हल्ला भारताच्या आर्थिक सामर्थ्य आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाला धक्का देण्यासाठी ताज आणि ट्रायडेंटसारखी ठिकाणं लक्ष्य करण्यात आली,” असेही त्यांनी सांगितले. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्याने भारताच्या ताकदीला आव्हान देण्याचा पाकिस्तानचा उद्देश यामध्ये लपलेला होता, त्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘पीओकेत घुसून कारवाई केल्यानंतर जगाने भारताची ताकद पाहिली’

पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांच्या हत्या झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचा फडणवीसांनी गौरव केला. “दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही, असा कठोर संदेश मोदींनी संपूर्ण जगाला दिला. त्यानंतर भारतीय सैन्याला मोकळीक देण्यात आली आणि आपल्या तीनही दलांनी पाकिस्तानमध्ये घुसून टार्गेट नष्ट केले. ऑपरेशन सिंदूरद्वारे जगाने भारताची खरी ताकद अनुभवली,” असे फडणवीस म्हणाले.

‘धोका अद्याप कायम आहे; नागरिकांनी सजग राहायला हवे’

दहशतवादाचा धोका अद्याप कायम असल्याची जाणीव करून देत फडणवीसांनी भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. “लढाई अजून संपलेली नाही. पाकिस्तानला माहिती आहे की थेट युद्ध जिंकणं शक्य नाही. म्हणूनच ते अशाप्रकारच्या कटकारस्थानांचा मार्ग निवडत राहतील. म्हणूनच प्रत्येक भारतीय नागरिक सजग असणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचेही फडणवीसांनी या वेळी कौतुक केले. “ही केवळ स्मरणाची घटना नसून, भारताला सतत सावध राहण्याचा संदेश देणारा दिवस आहे. शहिदांचे बलिदान विसरता कामा नये,” असे सांगत त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

आणखी वाचा