कोकणाचं कोकणपण जपलं पाहिजे : प्रसाद गावडे

“युवा आणि मराठी साहित्याची नवी वाट” परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद एआय", "चॅट जीपीटी"चे साहित्यावर संक्रमण असले तरी डिजिटल माध्यमाला मर्यादा

रत्नागिरी, दि. २३ : “कोकण हा फक्त भूगोल नाही, तर पर्यावरणासोबत जगण्याची पद्धत आहे. आपण जगण्याचं डॉक्युमेंटेशन केलं नाही, तर कोकण आपल्याला नजरेतून निसटत जाईल. साहित्य लिहिताना कोकणाचं कोकणपण जपलं पाहिजे,” असे मत “कोकणी रानमाणूस” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसाद गावडे यांनी व्यक्त केले. ‘कोकणातील स्थलांतर, रोजगार, इको टुरिझम, दलालांची वाढ आणि शाश्वत जीवनशैली’ याविषयी त्यांनी परखड भाष्य करून उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ (मुंबई) आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित “युवा आणि मराठी साहित्याची नवी वाट” या परिसंवादात गावडे बोलत होते. रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २२ नोव्हेंबर रोजी झालेला हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

“कोकण संपत चाललंय; लिहिणारे तरुण निर्माण झाले पाहिजेत”

प्रसाद गावडे म्हणाले,
“कोकणातील ग्रामीण तरुण शिकतो आहे, पण आपल्या जगण्याचं वास्तव तेवढ्याच ताकदीने तो लिहित नाही. मी अलीकडे कडवईत जाऊन मुस्लिम समाजावर मालिका केली. त्या संदर्भात युवांकडून आलेल्या प्रतिक्रिया धर्मांध मानसिकतेकडे झुकणाऱ्या होत्या, हे गंभीर आहे. बोली, संस्कृती, परंपरा जपणारा कोकण झपाट्याने बदलतोय. आपण लिहिलं नाही तर रापणासारखी परंपरा संपून जाईल.”

“युवा लेखक निडर असतो; प्रेमच नव्हे तर वास्तवही लिहा”

पत्रकार दुर्गेश आखाडे यांनी युवा लेखकांना प्रोत्साहनाची गरज असल्याचे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी म्हणाले, “युवा लेखक थेट वाचकांच्या संपर्कात आहे. तो निडर आहे. त्यामुळे फक्त प्रेमकविता नाही, तर आपल्या आसपासचंच वास्तवही संवेदनशीलतेने मांडलं पाहिजे.”

“बोलीभाषा वाचली तरच साहित्य वाचेल”

चिपळूणचे युवा कार्यकर्ते मल्हार इंदुलकर म्हणाले,
“आपण आपल्या सोयीनुसार विचार करून साहित्याला तोडतो. बोलीभाषा जपल्या तरच साहित्य टिकेल. त्यामुळे मूळ लिखाण बोलीत येणं गरजेचं.”

एआय काळातही आशादायक साहित्य येईल – प्रा. सुहास बारटक्के

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुहास बारटक्के यांनी
“एआय, चॅट जीपीटीमुळे साहित्यावर नवे प्रयोग होत आहेत. आजचे तरुण सजग आहेत. ते नवीन आणि चांगलं घेऊन येणारच,” असा विश्वास व्यक्त केला.

“डिजिटलचं युग आलं तरी साहित्याला मर्यादा असतात”

परिसंवादाचे अध्यक्ष जयू भाटकर यांनी विचारांचा गोषवारा सादर करत “डिजिटल माध्यम कितीही वाढलं, तरी साहित्यात त्याला मर्यादा आहेत. प्रत्यक्षातील संवेदना कधीही डिजिटलला बदलता येणार नाही,” असे सांगितले.

आणखी वाचा