चिपळूणच्या दोन सायकलपटूंची काश्मीर–कन्याकुमारी मोहीम; ४ हजार किमी प्रवास फक्त १६ दिवसांत

चिपळूण दि. २५ : काश्मीर ते कन्याकुमारी या तब्बल चार हजार किलोमीटरच्या अखंड सायकल प्रवासात चिपळूणच्या दोन तरुण सायकलपटूंनी ऐतिहासिक मजल मारली आहे. चिपळूण सायकलिंग क्लबचे रायडर्स अहमद शेख आणि राघव खर्चे यांनी केवळ सोळा दिवसांत हा दैदिप्यमान प्रवास पूर्ण करत देशभरातील १५० निवडक सायकलपटूंमध्ये चमकदार ठसा उमटवला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकार आणि ‘फिट इंडिया’च्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

ही मोहीम १ नोव्हेंबर रोजी श्रीनगर येथे झेंडा दाखवून सुरू झाली. जम्मू, दिल्ली, जयपूर, उदयपूर, गोध्रा, स्टॅच्यू ऑफ युनिटीमार्गे पुढे धुळे, सोलापूर, बेंगळुरू होत कन्याकुमारी येथे ध्येय गाठण्यात आले. अंतिम टप्प्यावर विवेकानंद केंद्रात सर्व सायकलपटूंना अधिकृत प्रमाणपत्र आणि पदक प्रदान करण्यात आले.

सोळा दिवसांच्या या कठीण प्रवासात रोज २५० किलोमीटरहून अधिक अंतर पार करावे लागले. थंडी, वाऱ्याचा वेग, प्रखर उष्णता, तसेच सायकलींचे तांत्रिक बिघाड या आव्हानांना सामोरे जात रायडर्स पुढे सरकले. प्रवासादरम्यान अहमद शेख यांनी तब्बल २६ रायडर्सच्या पंक्चर समस्या सोडवल्या, तर राघव खर्चे आणि शेख यांनी अनेक साथीदारांना तांत्रिक मार्गदर्शनासह मानसिक बळ देत प्रवास पूर्ण करण्यास मदत केली. “या दोघांमुळेच आमची मोहीम पूर्ण झाली,” असा भावनिक गौरव सहभागी रायडर्सनी नोंदवला.

चिपळूणच्या क्रीडा इतिहासात अभिमानाची नवी नोंद करणाऱ्या या वीरांचे शहरात आगमन झाले तेव्हा फटाक्यांच्या आतषबाजीने भव्य स्वागत करण्यात आले. दोन तरुण सायकलपटूंच्या जिद्द, तयारी आणि अविश्रांत संघर्षामुळे जिल्ह्याच्या क्रीडा अभिमानात आणखी एक झळाळते पान जोडले गेले आहे.

आणखी वाचा