देवरूखच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही : पालकमंत्री उदय सामंत

देवरूख, दि. २५ : “देवरूखच्या विकासाची जबाबदारी मी घेतो. कोणतेही काम थांबणार नाही, निधी कमी पडणार नाही. नागरिकांच्या दैनंदिन गरजा, बदलत्या अपेक्षा आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला शासनाच्या माध्यमातून निधी मिळेल,” असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी देवरूखवासीयांना देत महायुतीच्या प्रचारसभेला जोरदार चालना दिली. देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नृसिंह मंगल कार्यालयात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

सामंत म्हणाले की, देवरूखसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरासाठी आगामी काळ अत्यंत निर्णायक आहे. येथे वाढणारी लोकसंख्या, पायाभूत सुविधांची गरज, पर्यटनाच्या दृष्टीने असलेली क्षमता आणि शिक्षण, आरोग्य, वाहतूक क्षेत्रात व्यापक काम करण्याची आवश्यकता लक्षात घेता, महायुतीने ठोस व्हिजन बाळगणे आवश्यक आहे. “आपला निवडणूक प्रचार फक्त जिंकण्यासाठी नसून विकासाचे आश्वासन देणारा आणि त्याची अंमलबजावणी करणारा असावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीत महायुती अत्यंत मजबूत असल्याचे सांगत सामंत म्हणाले, “जिंकणार आहोत म्हणून आत्मसंतुष्ट होऊ नका. लोकांपर्यंत पोहोचा, त्यांच्या समस्या ऐका, उपाय सांगा. घराघरात जा आणि विश्वास द्या की पुढील पाच वर्षे देवरूखसाठी विकासाचा सुवर्णकाळ ठरणार आहे.” नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. मृणाल शेट्ये यांना पाठिंबा देत त्यांनी ज्या-ज्या कामांसाठी निधी लागेल त्यासाठी शासनस्तरावर स्वतः पुढाकार घेण्याची हमी दिली.

सामंत यांनी यावेळी आमदार शेखर निकम यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. “संगमेश्वर तालुक्यातील विकास त्यांच्या माध्यमातून गतिमान झाला आहे. जनतेच्या समस्या जाणून घेऊन काम करणारा नेता म्हणून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आपुलकी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. विकासकामांबद्दल सातत्याने संवेदनशील राहिलेल्या स्थानिक नेतृत्वामुळे देवरूख परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

सभेला माजी आमदार सुभाष बने, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, भाजपचे निवडणूक प्रभारी प्रमोद अढटराव, भाजप तालुकाध्यक्ष रूपेश कदम, राष्ट्रवादीचे राजेंद्र पोमेंडकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार उपस्थित होते. नागरिकांचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांनी केले.

सामंत यांची निवडणूक सभा संपल्यानंतर महायुती कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, देवरूख नगरपंचायत निवडणुकीत महायुती भक्कमपणे आघाडीवर राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा