नवी दिल्ली, दि. २७: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महाराष्ट्र शासनाने गेल्या महिन्यात युनेस्कोच्या मुख्यालयासाठी भेट म्हणून दिला होता. संविधान दिनाचे औचित्य साधत पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयाच्या प्रांगणात या पुतळ्याचे अनावरण काल (ता. २६) करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या ऐतिहासिक क्षणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमान व्यक्त करत युनेस्कोचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.
पुतळ्याचे अनावरण युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते झाले. या वेळी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या अनावरण सोहळ्यामुळे भारतीय संविधानाचे जनक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नवा सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या विद्वत्तेने, कर्तृत्वाने आणि प्रबळ नेतृत्वातून जगाला समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखवला. संविधान दिनीच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होणे, हे भारतासारख्या सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या संविधानाला दिलेला सर्वोच्च मान आहे.” पुढे ते म्हणाले, “भारताला प्राप्त झालेले संविधान हे डॉ. आंबेडकर यांच्या अपूर्व बुद्धिमत्ता आणि कार्याचे अद्वितीय प्रतीक आहे. महाराष्ट्रातील जनतेतर्फे आम्ही हा सन्मान डॉ. आंबेडकरांना वंदन असल्याचे मानतो. या उपक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व प्रयत्नकर्त्यांचे अभिनंदन.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जागतिक स्तरावर पोहोचावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने यापूर्वीही विविध ऐतिहासिक उपक्रम राबवले आहेत. लंडनमधील त्यांच्या वास्तूची खरेदी करुन तिला संग्रहालयाचा दर्जा देण्यात आला आहे; जपानमधील कोयासान विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच, मुंबईतील इंदुमिल येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामालाही गती देण्यात आली असून त्याच्याशी संबंधित सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस वेळोवेळी देत असल्याचे सांगण्यात आले.








