कडवई, दि. २९ : संगमेश्वर तालुक्यातील शिवशंभो नमन नाट्य मंडळाने यंदा मुंबईच्या रंगभूमीवर सादर केलेल्या बहुरंगी ‘नमन’ प्रयोगाने रसिकांचे मनोमनी जिंकले. जितेंद्र महाडिक यांच्या निर्मितीतील या नाट्यप्रयोगाने पारंपरिक नमनशैलीला आधुनिकतेची सुंदर जोड देत प्रेक्षकांना एक वेगळीच कलानुभूती दिली.
संदीप सावंत लिखित ‘कंस कथा – क्रोधाने तृणावर्त पेटला’ या कथानकावर उभारलेला कृष्ण–तृणावर्त संघर्ष हा प्रयोगाचा आत्मा ठरला. वायुरूपात तृणासुराचे प्रभावी दर्शन, कृष्णासोबतचा थरारक मुकाबला आणि तृणावर्त वधानंतर कंस घाबरून उठण्याचा प्रसंग — या सर्वांनी सभागृहात थरार निर्माण केला. नटखट गौळणींच्या धमाल सादरीकरणाने तर आनंदाची उधळणच केली.
नमनातील सामाजिक संदेश देणाऱ्या प्रस्तुतीत कलाकारांनी महिलांवरील अत्याचारांचा मुद्दा मांडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायव्यवस्थेचा आदर्श उलगडला. या प्रभावी भाषणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद देत *“छत्रपती शिवाजी महाराज की जय!”*च्या घोषणांनी नाट्यगृह दणाणून गेले.
‘सुदामाची धमाल, मावशीची कमाल’ या विनोदी प्रस्तुतीने प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर पारंपरिक कलेचा ठसा उमटवणारे कोंबडा नृत्य आणि मयूर नृत्य विशेष आकर्षण ठरले. स्थानिक कलाकारांच्या अभिनय, नृत्यकौशल्य आणि पारंपरिक वेशभूषेने रंगमंच अविस्मरणीय झाला.
शिवशंभो नमन नाट्य मंडळाचा हा भव्य उपक्रम तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळवत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.








