राऊत विरुद्ध जाधव संघर्ष तीव्र; भास्कर जाधवांना मातोश्रीची समज?

चिपळूण, दि. २९ : चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटात मोठा संघर्ष उफाळून आला आहे. नगराध्यक्ष पदासह २४ जागांवर अधिकृत उमेदवार उभे करून निवडणुकीत उतरलेल्या ठाकरे गटाला, स्वतःच्या आमदाराकडूनच धक्का बसल्याने गोट्यात मोठी खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये पक्षाच्या नियुक्त उमेदवारांना पाठिंबा न देता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार रमेश कदम यांच्या बाजूने उघड प्रचार सुरू केला. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षांतर्गत नाराजी शिगेला पोहोचली असून या हालचालींची माहिती थेट मातोश्रीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते.

जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन रमेश कदम यांना समर्थन घोषित केले आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीमुळे आपण ही भूमिका घेत असल्याचे सांगितले. “शब्द दिल्याने मागे हटणार नाही,” असे ठाम विधान करत त्यांनी खुल्या मैदानात पाऊल टाकले. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या निवडणूक रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मातोश्रीकडून त्यांना “पक्षाला नुकसान होईल असे कोणतेही पाऊल उचलू नका” असा स्पष्ट संदेश देण्यात आल्याची चर्चा आहे.

गेल्या काही काळापासून खासदार विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यातील मतभेद वाढत असल्याचे बोलले जात होते. या दोन नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष आता निवडणुकीच्या तोंडावर अधिकच प्रकर्षाने समोर आला आहे. विनायक राऊत यांनी स्वतःचे अधिकृत उमेदवार जाहीर करताना “चिपळूणमध्ये महाविकास आघाडी झालीच नाही” असे विधान करून पक्षाची ठाम भूमिका स्पष्ट केली. मात्र दुसरीकडे जाधव यांनी आपल्या नाराजीची चिन्हे वारंवार दाखवली असून माध्यमांशी बोलताना “मला एका निर्णयापर्यंत यावेच लागेल” असे संकेत दिले.

या सर्व घडामोडींना छेद देत जाधव यांनी रमेश कदम यांच्या प्रचारसभांमध्ये थेट सहभाग घेतला असून चिपळूणमध्ये या प्रकरणामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. या संघर्षामुळे ठाकरे गटात दोन गट निर्माण झाल्याचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. ऐन निवडणुकीत उघड झालेल्या या फुटीमुळे चिपळूण नगरपरिषद निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरली आहे. आता मातोश्रीवरून समज मिळाल्यानंतर भास्कर जाधव कोणती भूमिका घेतात, हे पाहणे कोकणातील राजकारणातील सर्वात मोठे औत्सुक्य ठरले आहे.

आणखी वाचा