भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव; कोहली-रोहितची जबरदस्त कामगिरी

दक्षिण आफ्रिकेनं दिला कडवा मुकाबला

रांची, दि. ३० : जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 17 धावांनी रोमांचक विजय मिळवला. विराट कोहलीच्या धमाकेदार शतकासह रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. शेवटच्या टप्प्यापर्यंत दक्षिण आफ्रिकेने सामना खेळीत ठेवला आणि भारतीय गोलंदाजांना घाम फोडला पण अखेरीस भारताने हा सामना आपल्या नावे केला.

या सामन्यात विराट कोहलीने 102 चेंडूत शतक झळकावत इतिहास रचला. एकाच फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत कोहलीने वनडे स्वरूपातील आपले 52वे शतक पूर्ण केले. सचिनने कसोटीत 51 शतके ठोकली होती, तर कोहलीने वनडेमध्ये 52 शतकांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे कोहलीचे हे शतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील 7000वं शतक ठरले. यापूर्वी जगभरातील फलंदाजांनी मिळून 6999 शतके झळकावली होती आणि कोहलीने हा दुर्मिळ टप्पा पूर्ण केला. या सामन्यात त्याने 120 चेंडूत 135 धावा करत 11 चौकार व 7 षटकारांची आतषबाजी केली.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीची भागीदारीही सामन्याचा निर्णायक टप्पा ठरली. पहिल्या विकेटसाठी यशस्वी जैस्वाल लवकर बाद झाल्यानंतर रोहित-कोहली जोडीने 136 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत डावाला स्थैर्य दिले. रोहितने 51 चेंडूत 57 धावा करत जोरदार फलंदाजी केली. त्याचबरोबर रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये ‘सिक्सर किंग’ बनत आणखी एक इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला. रोहितच्या नावावर आता वनडेमध्ये 352 षटकार असून त्याने आफ्रिदीच्या 351 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत आठ बाद 349 धावा उभारल्या. कोहली आणि रोहित व्यतिरिक्त केएल राहुलनेही अर्धशतक ठोकत भारतीय धावफलक भक्कम केला. 350 धावांच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या भारतीय डावाला अनेकांनी आपापल्या शैलीने गती दिली.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 49.2 षटकांत 332 धावांवर गारद झाला. मॅथ्यू ब्रिट्झके (72), मार्को जॅन्सन (70) आणि कॉर्बिन बॉश (67) यांनी सलग झटके देत भारताला अडचणीत आणले. एका क्षणी सामना आफ्रिकेकडे झुकला होता, मात्र निर्णायक क्षणी भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. भारताकडून कुलदीप यादवने चार बळी घेतले, तर हर्षित राणाने तीन विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीला खिंडार पाडले. अर्शदीप सिंगला दोन आणि प्रसिद्ध कृष्णाला एक बळी मिळाला.

या विजयातून भारताने केवळ मालिकेत आघाडी घेतली नाही तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दोन ऐतिहासिक कामगिरींनी भारतीय चाहत्यांचा आनंदही दुणावला. कोहलीचे विक्रमशतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 7000वा शतकाचा बहुमान आणि रोहितचा ‘सिक्सर किंग’मधील इतिहास – या सर्वामुळे हा सामना भारतीय क्रिकेटसाठी संस्मरणीय ठरला.

आणखी वाचा