राज्यातील शिक्षकांना शिक्षण परिषदेतून ‘सकारात्मक शिस्ती’चे धडे; डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विशेष सत्रांचे आयोजन

मुंबई, दि. ३०: राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर शारीरिक शिक्षेचे प्रकार उघडकीस येत असताना समाजात याबाबत वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षित शालेय वातावरण आणि शिक्षक–विद्यार्थी संवाद अधिक मजबूत करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर किमान 45 मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे सत्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.

या विशेष मार्गदर्शन सत्रांमध्ये शारीरिक शिक्षेबाबत शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतुदी, शिक्षकांची जबाबदारी, शिक्षेचे प्रकार व त्यांचे स्वरूप, शिक्षेचे मानसिक व शारीरिक परिणाम, मेंदूवरील दुष्परिणाम, विविध शैक्षणिक विचारवंतांचे सकारात्मक शिस्तीवरील विचार, सकारात्मक शिस्तीची तत्त्वे, त्यांच्या अंमलबजावणीचे मार्ग आणि वर्ग व्यवस्थापनातील संवाद–सहकार्य–समुपदेशनाचे महत्त्व या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच सकारात्मक शिस्तीची तंत्रे आणि उपक्रम शिक्षकांना प्रत्यक्षात अवलंबता येतील अशा पद्धतीने सादर करण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं विकसित केलेल्या मुख्याध्यापक मार्गदर्शिका भाग–२ मधील ‘सकारात्मक शिस्त – एक आव्हान’ या लेखाचा आधार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनानुसार हे विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले असून, “शिस्त ही भीतीतून नव्हे तर विश्वासातून निर्माण झाली पाहिजे; सकारात्मक शिस्त हीच मुलांच्या उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

आणखी वाचा