रत्नागिरी, दि. ०१ (अंकुश कदम): रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा दिवस आता उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तयारीला आज अखेर अंतिम स्वरूप मिळाले असून रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड तसेच देवरूख, लांजा व गुहागर नगरपंचायत हद्दीतील प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभर निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी सर्वतोपरी सज्जता दाखवली आहे. उद्या म्हणजेच २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात होणार असून संपूर्ण जिल्ह्यातील हजारो नागरिकांचा लोकशाही उत्सव साजरा करण्याचा क्षण अवघ्या काही तासांवर आला आहे.
दरम्यान, रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी ६९ मतदान केंद्रांवर आज सकाळपासूनच ईव्हीएम मशीन, मतपेट्या आणि अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले. मतपेट्या घेऊन जाणाऱ्या वाहनांना कडेकोट पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कोणत्याही अनधिकृत हस्तक्षेपाला वाव मिळू नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलीस दल, एसआरपीएफ, आरसीपी आणि होमगार्ड पथके तैनात करण्यात आली आहेत. निवडणुकीत सहभागी प्रत्येक अधिकाऱ्याला विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून सर्व अधिकारी आणि कर्मचारी आजपासूनच आपल्या-आपल्या ठिकाणी दाखल झाले आहेत.
रत्नागिरीत ६९ केंद्रांवर ६४,५४६ मतदार
रत्नागिरी शहरातील नगरपरिषद निवडणुकीचा उत्साह मोठा असून शहरातील एकूण ६९ मतदान केंद्रांवर यावर्षी ६४ हजार ५४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ३१,३२४ पुरुष, ३३,४२१ महिला आणि १ इतर मतदाराचा समावेश आहे. शहराच्या विविध प्रभागांमध्ये सकाळपासूनच तयारीचे वातावरण होते. निवडणूक अधिकारी जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याकडून ईव्हीएम मशीनची तपासणी करून नंतर ती आपल्या आपल्या केंद्रांकडे रवाना करण्यात आली.
प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा, बसण्याची जागा, विजेची उपलब्धता यांची व्यवस्था केली आहे. पोलिसांनी शहरातील सर्व मार्गांवर गस्त वाढवली असून केंद्रांवर आवश्यकतेनुसार अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित, सुधारित कार्यक्रम ४ डिसेंबरला
रत्नागिरी नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक १० मधील दोन अपिलांवरील निर्णय २५ नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर त्या प्रभागातील सदस्य पदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या प्रभागासाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी घोषित केला जाईल. मात्र नगराध्यक्ष पदासाठीच्या मतदानात हा प्रभागही सहभागी राहणार असून उर्वरित प्रभागांप्रमाणेच त्याठिकाणी मतदानाची प्रक्रिया उद्या नियोजित वेळापत्रकानुसार पार पडेल.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या बदलाबाबत नागरिकांना माहिती देताना प्रभाग क्रमांक १० मधील मतदार आणि उमेदवारांनी याची योग्य नोंद घ्यावी, असे सांगितले. राज्यभरातील अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये अपिलांचा निकाल २२ नोव्हेंबरनंतर लागल्यामुळे त्या जागांसाठी २ डिसेंबरच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान घेता येणार नाही, असा आयोगाचा निर्णय असून या आदेशाचा प्रभाव रत्नागिरीतील या प्रभागावर पडला आहे.
जिल्हा पोलीस दलाचा कडेकोट बंदोबस्त
जिल्ह्यातील निवडणूक पारदर्शक, शांततेत आणि भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५७ पोलीस अधिकारी, ५८९ पोलीस अंमलदार, एसआरपीएफची एक कंपनी, आरसीपीच्या दोन तुकड्या तसेच तब्बल ५५० होमगार्ड यांचा समावेश आहे.
गुन्हेगारी किंवा गैरप्रकार करणाऱ्यांवर पूर्वतयारी म्हणून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत ५७६ प्रकरणे कलम १२६ अन्वये, ३ प्रकरणे कलम १२७ अन्वये, २८ प्रकरणे कलम १२८ अन्वये आणि ६८ प्रकरणे कलम १२९ अन्वये दाखल करण्यात आली आहेत. एमपीडा कायद्यांतर्गत एक कारवाई तर नऊ तडीपारी प्रस्तावही दाखल आहेत. ही सर्व आकडेवारी प्रशासन निवडणूक गांभीर्याने घेत असल्याचे प्रतिक आहे.
जिल्ह्यात ११ ठिकाणी भरारी पथके (FST) आणि २५ ठिकाणी स्थिर निरीक्षण पथके (SST) तैनात केली आहेत. या पथकांकडून वाहतूक तपासणी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, रोख रक्कम, दारू किंवा इतर प्रलोभनात्मक साहित्याची आवक-जावक रोखणे यांसारखी महत्त्वाची कामे केली जात आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर पोलिसांनी वाहन तपासणी वाढवली असून हायवे, घाटरस्ते आणि गावांमधील महत्त्वाच्या चेकपोस्टवर अतिरिक्त कर्मचारी तैनात आहेत.
राजापूर नगरपरिषद: ८० कर्मचाऱ्यांची फौज, ८ हजार १४३ मतदार सज्ज
राजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठीही आज तयारीची अंतिम टप्प्यातील धडपड दिसून आली. शहरात उद्या लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच १० प्रभागांमधील २० नगरसेवक जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण ८,१४३ मतदार या निवडणुकीत सहभागी होणार असून त्यामध्ये ४,२१९ महिला आणि ३,९२४ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळपासूनच कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. १० मतदान केंद्रांसाठी एकूण ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांनीही संपूर्ण शहरातून संचलन करत कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचा संदेश दिला. राजापूरमध्ये एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत असताना काही प्रभागांत अपक्ष उमेदवारही रिंगणात आल्याने स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे.
चिपळूणमध्ये ४८ मतदान केंद्रे; बांदल हायस्कूल ‘आदर्श’, महाराष्ट्र हायस्कूल ‘सखी’ केंद्र
चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत ४२ हजार ५८२ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. २१,५९६ महिला आणि २०,९८६ पुरुष मतदार उद्या मतदान करणार आहेत. शहरात २६ ठिकाणी ४८ मतदान केंद्रे कार्यरत राहतील. यापैकी बांदल हायस्कूलमधील केंद्र आदर्श केंद्र म्हणून तर महाराष्ट्र हायस्कूलमधील केंद्र महिलांसाठी विशेष ‘सखी केंद्र’ म्हणून सजवण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी ५३१ कर्मचाऱ्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. प्रांताधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिवसभर चिपळूणमध्ये मतदान साहित्य वितरण, केंद्र तपासणी, कर्मचारी नियुक्ती यांचे काम सुरळीतरीत्या पूर्ण करण्यात आले.
२ डिसेंबरला कामगारांसाठी भरपगारी सुट्टी
मतदान हक्क बजावणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याने कामगारांना २ डिसेंबर रोजी भरपगारी रजा देण्याचे आदेश उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने जारी केले आहेत. दुकाने, हॉटेल्स, कारखाने, आयटी कंपन्या, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स या सर्व ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना मतदानासाठी आवश्यक सुट्टी देणे अनिवार्य आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगारांना पूर्ण दिवस रजा देणे शक्य नसल्यास किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न झाल्यास संबंधित नियोक्त्यांवर कारवाई होणार आहे, असे सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी स्पष्ट केले.
३४ जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी
राज्य शासनाने २ डिसेंबर २०२५ रोजी ज्या ३४ जिल्ह्यांमध्ये नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुका होत आहेत त्या सर्व मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे. रत्नागिरीसह पालघर, रायगड, नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, धुळे अशा अनेक जिल्ह्यांतील शेकडो नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये उद्या मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे.
मतदानानंतर EVM स्ट्राँगरूममध्ये जमा; ३ डिसेंबरला मतमोजणी
उद्या सायंकाळी ५.३० वा. मतदान संपल्यानंतर सर्व मतपेट्या आणि ईव्हीएम मशीन कडेकोट बंदोबस्तात स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर मतमोजणीची तयारी सुरू होईल. ३ डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय भवितव्य निश्चित करणारे निकाल जाहीर होणार असून सर्वांच्या नजरा त्यावर लागून राहणार आहेत.








