रत्नागिरी दि. १ : नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचताना राज्यात शिवसेनेच्या बाजूने अनुकूल वारे वाहत असून, या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा फायदा मिळणार असल्याचा ठाम विश्वास राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी निवडणूक प्रचारात महायुतीची भक्कम घोडदौड व मतदारांचा मिळणारा मोठा प्रतिसाद ही शिवसेनेच्या विजयाची पावती असल्याचे सांगितले.
सामंत म्हणाले की, राज्यभरातील प्रचारात शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ५३ विक्रमी सभा घेतल्या असून, जवळपास २० जिल्ह्यांचा दौरा पूर्ण केला आहे. “एकनाथ शिंदे यांच्या सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हे स्पष्ट होते की शिवसेनेच्या धोरणांना आणि शिंदे साहेबांच्या कामकाजाला राज्यातील जनतेने मोठा पाठिंबा दिला आहे,” असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांनाही सामंत यांनी यावेळी अधोरेखित केले.
“माझी लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, स्वयंरोजगारासाठी स्टायपेंड, मुलींचे शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय—या सर्व योजनांमुळे महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वच वर्गांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे,” असे सामंत म्हणाले. या योजनांचा थेट परिणाम नगरपरिषदांच्या प्रचारसभांमध्ये जाणवत असून, ‘शिंदे यांचा निर्णय, लोकांचा विश्वास’ असे समीकरण तयार झाल्याने शिवसेनेला राज्यभर मोठे यश मिळण्याची चिन्हे स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
सामंत यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याचाही उल्लेख केला. “श्रीकांत शिंदे यांनी आठ जिल्ह्यांत २२ सभा घेतल्या. मंत्र्यांनीही सर्वदूर दौरे केले. मी स्वतः सात-आठ जिल्हे गाठत ३६ सभा घेतल्या आहेत. संपूर्ण राज्यात शिवसेनेचा झंकार सुरू आहे,” असे ते म्हणाले. महाराष्ट्रभर दिसत असलेले हे वातावरण लक्षात घेतले तर नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फायदा मिळणार असल्याचा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
युतीबाबत बोलताना सामंत म्हणाले की, “या निवडणुकीत अनेक ठिकाणी आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढतोय. काही ठिकाणी स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत आहे. मात्र जिथे जिथे युती आहे तिथे महायुतीचा भगवा फडकेल आणि जिथे शिवसेना स्वतः लढत आहे, तिथेही मतदारांचा विश्वास आमच्याच बाजूने आहे.”
महाविकास आघाडीवर निशाणा साधताना सामंत म्हणाले, “या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते कुठेच दिसले नाहीत. प्रचारात त्यांचा सहभाग जवळजवळ शून्य आहे. हे चित्र पाहता त्यांनी निवडणुकीआधीच पराभव स्वीकारला आहे, हे स्पष्ट जाणवते. लोकांशी संवाद नाही, सभा नाहीत, दौरे नाहीत—म्हणूनच जनतेने त्यांना दारातच थांबवले आहे.”
रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार मजबूत स्थितीत असून, मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद हे यशाचे संकेत असल्याचे सामंत यांनी नमूद केले. “रत्नागिरीत भगवा पुन्हा उंच फडकणार आहे आणि महायुतीला अभूतपूर्व विजय मिळेल,” असे सांगत सामंत यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकजुटीने मतदानासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.








