नवी दिल्ली, दि. ०३ : भारत सरकारने २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी जनगणनेबाबत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून, देशाच्या इतिहासातील ही पहिलीच डिजीटल जनगणना असणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत या संदर्भातील सविस्तर माहिती दिली.
सरकारने १६ जून २०२५ रोजी राजपत्रात जनगणनेची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळ समितीच्या निर्णयानुसार यावेळी ७० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच जातींची गणनाही करण्यात येणार आहे. काँग्रेसचे खासदार चमला किरण कुमार रेड्डी आणि भाजपाचे खासदार एटेला राजेंद्र यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती देण्यात आली.
डिजिटल जनगणनेदरम्यान मोबाइल अॅप्सद्वारे माहिती संकलन केले जाईल. मात्र, तांत्रिक सुविधा उपलब्ध नसलेल्या दुर्गम भागात पारंपरिक कागदाधारित पद्धती वापरली जाणार आहे, असेही राय यांनी स्पष्ट केले.
२०२७ ची जनगणना दोन टप्प्यांमध्ये
लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले की आगामी जनगणना दोन टप्प्यात घेतली जाईल.
पहिला टप्पा : एप्रिल ते सप्टेंबर २०२६
या टप्प्यात घरांची यादी तयार करणे व गृहनिर्माण गणना केली जाईल.
दुसरा टप्पा : फेब्रुवारी २०२७
यामध्ये प्रत्यक्ष जनगणना केली जाईल. अंतिम जनगणना दिनांक १ मार्च २०२७ निश्चित करण्यात आला आहे. मात्र लडाख व इतर बर्फाळ प्रदेशांमध्ये सप्टेंबर २०२६ मध्येच जनगणना पूर्ण केली जाईल.
पूर्वचाचणी पूर्ण
१ मार्च २०२७ रोजीच्या जनगणनेपूर्वी १० ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान डिजिटल प्लॅटफॉर्म, सर्वेक्षण तंत्रे आणि लॉजिस्टिक्सची पूर्वचाचणी घेण्यात आली. कोविड-१९ मुळे २०२१ ची जनगणना पुढे ढकलल्याने ही प्रक्रिया आता २०२७ मध्ये होणार आहे.








