दक्षिण आफ्रिकेचा रोमहर्षक विजय; भारताला 4 विकेटने धक्का, कोहली-ऋतुराजची शतकी खेळीही व्यर्थ

रायपूर, दि. ०३ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात धावांचा वर्षाव झाला, पण सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेने प्रभावी खेल करत भारतावर 4 विकेटने मात केली. शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 5 बाद 358 धावांचा भक्कम डोंगर उभारला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेने चार चेंडू राखून लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये मालिकेचा निर्णायक सामना रंगणार आहे.

कोहली-ऋतुराजची तडफदार शतकी खेळी
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमनं टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. सुरूवातीलाच भारताला धक्का बसला. रोहित शर्मा 14 धावांवर आणि यशस्वी जयस्वाल 22 धावांवर परतले. दहाव्या षटकात दोन विकेट गेल्यानंतर विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने भारतीय डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भक्कम भागीदारी केली.

ऋतुराजने 83 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 105 धावांची आकर्षक शतकी खेळी साकारली. वनडे क्रिकेटमधील त्याचे हे पहिले शतक ठरले. दुसरीकडे विराट कोहलीनेही दमदार खेळी करत 93 चेंडूत 102 धावा ठोकल्या. त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 2 षटकार निघाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरे शतक झळकावत कोहलीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 84 वे आणि वनडे क्रिकेटमधील 53 वे शतक गाठले.

यानंतर वॉशिंग्टन सुंदर केवळ एका धावेवर बाद झाला. तरीही कर्णधार केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने डावाला चांगली धार दिली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. राहुलने 43 चेंडूत नाबाद 66 धावा करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. जडेजाने 27 चेंडूत 24 धावा जोडल्यानं भारताने 358 धावांचा मजबूत टप्पा गाठला. आफ्रिकेकडून मार्को यान्सेनने 2 विकेट घेतल्या, तर एनगिडी आणि बर्गरला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

मार्करमच्या शतकामुळे आफ्रिकेचा डाव फुलला
359 धावांचा प्रचंड पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरुवातीला डगमगला. क्विंटन डी कॉक 26 धावांवर तंबूत परतला. कर्णधार टेम्बा बावुमा 46 धावा करून बाद झाला. मात्र डेवाल्ड ब्रेविसने 54 धावा करत डावाला स्थैर्य दिले. त्यानंतर एडन मार्करमने जबाबदारीची खेळी साकारत 110 धावांचे शतक ठोकले. त्याने भारतीय गोलंदाजांवर स्वच्छ हुकूमत गाजवली.

ब्रीत्झकेने 68 धावांची अर्धशतकी खेळी करीत मार्करमला उत्तम साथ दिली. शेवटी टायटन बॉश आणि केशव महाराज यांनी संयम राखत उर्वरित कामगिरी बजावली आणि दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित केला.

भारतीय गोलंदाजांचा अपयश
भारताकडून प्रसिद्ध कृष्णा याने 2 विकेट घेतल्या; परंतु त्याने सर्वाधिक धावा सोडल्या. बाकीच्या गोलंदाजांकडून अपेक्षित प्रदर्शन झाले नाही. मोठी धावसंख्या उभी करूनही भारताला गोलंदाजीच्या कमकुवतपणाचा फटका बसला.

तिसरा सामना निर्णायक
मालिका आता 1-1 अशी समसमान झाली असून 6 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये निर्णायक सामना खेळला जाणार आहे. भारताकडून फलंदाजीत विराट-ऋतुराज चमकले असले, तरी विजयासाठी गोलंदाजीतील उणीवा भरून काढाव्या लागणार आहेत. तिसरा सामना जिंकून मालिका काबीज करता येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

आणखी वाचा