रत्नागिरी मुरुगवाडा–पांढरा समुद्रकिनारी पांढऱ्या वाळूची बेसुमार लूट

प्रशासनाचे दुर्लक्ष; किनारपट्टीची मोठी धूप

रत्नागिरी, दि. १७ : शहरालगतच्या मुरुगवाडा–पांढरा समुद्रकिनारी पांढऱ्या वाळूचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून महसूल यंत्रणेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. किनाऱ्यावरील मौल्यवान पांढरी वाळू डंपर आणि पिकअप वाहनांमधून बिनबोभाटपणे वाहून नेली जात असून, रात्रीच नव्हे तर भरदिवसा ओहोटीच्या वेळी थेट किनाऱ्यावर गाड्या लावून ही लूट सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून पांढऱ्या वाळूच्या गटांचा अधिकृत लिलाव झालेला नाही. पूर्वी साखरतर खाडीत हातपाटीच्या माध्यमातून मर्यादित वाळू उपसा केला जात असे. मात्र आता आरेवारे व पांढरा समुद्रकिनारा परिसरात कोणतीही परवानगी नसताना सर्रास वाळू काढली जात असल्याने लिलाव प्रक्रियाच बंद पडल्याचे वास्तव आहे. पूर्वी होडीद्वारे मर्यादित प्रमाणात वाळू वाहतूक होत असताना आता थेट किनाऱ्यावरूनच मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे शासकीय कामांमध्येही राजरोसपणे पांढऱ्या वाळूचा वापर होत असून, कागदोपत्री मात्र काळ्या वाळूचे दर दाखवले जात आहेत. काही शासकीय कार्यालयांच्या परिसरात पांढरी वाळू वापरली जात असतानाही संबंधित अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप आहे. काळ्या वाळूच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने पांढऱ्या वाळूचा वापर वाढत चालला आहे.

मागील काही दिवसांत भरती–ओहोटीचे वेळापत्रक पाहून नियोजनबद्धरीत्या उत्खनन सुरू असून यामुळे किनारपट्टीची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. भरदिवसा गाड्यांमध्ये वाळू भरली जात असतानाही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा पर्यावरणीय नुकसान अपरिमित होईल, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

आणखी वाचा