रत्नागिरी, दि. २१ : रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना–भाजपा महायुतीने ३२ पैकी तब्बल २९ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालातून रत्नागिरीकरांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यावर पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या विजयाची शक्यता वर्तवली जात होती. निकाल जाहीर होताच हे चित्र अधिक ठळक झाले. नगराध्यक्ष पदासह नगरपरिषदेत संपूर्ण सत्ता महायुतीकडे आली असून, केवळ ३ जागांवर शिवसेना (उबाठा) पक्षाला यश मिळाले आहे. उर्वरित सर्व प्रभागांमध्ये महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला.
विकासकामांचा मिळाला जनतेकडून कौल
गेल्या काही वर्षांत रत्नागिरी शहरात झालेली विकासकामे, पायाभूत सुविधा, तसेच पर्यटन विकासावर दिलेला भर हा या विजयामागील प्रमुख घटक मानला जात आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. रस्ते, नागरी सुविधा, सौंदर्यीकरण व पर्यटनस्थळांचा विकास याचा सकारात्मक परिणाम थेट मतपेटीतून दिसून आला.
विरोधकांकडे ठोस मुद्द्यांचा अभाव होता. ‘खड्डे’ हा एकमेव मुद्दा वगळता प्रभावी प्रचार नसल्याने मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.
तरुणांना संधी, कामगिरीवर लक्ष
या निवडणुकीत महायुतीने अनेक प्रभागांमध्ये तरुण व नव्या चेहऱ्यांना संधी दिली. तसेच, निवडून आलेला नगरसेवक वर्षभरात समाधानकारक कामगिरी न केल्यास त्याचा राजीनामा घेतला जाईल, अशी ठाम भूमिका ना. उदय सामंत यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे नव्या नगरसेवकांवर विकासकामांची जबाबदारी अधिक वाढली असून, नागरिकांमध्ये अपेक्षा उंचावल्या आहेत.
रत्नागिरी नगर परिषद निकाल २०२५
नगराध्यक्ष
▪️ महायुतीच्या उमेदवार सौ. शिल्पा सुर्वे विजयी
प्रभागनिहाय निकाल
▪️ प्रभाग १ – वैभवी खेडेकर, नितीन जाधव (महायुती)
▪️ प्रभाग २ – स्मितल पावस्कर, निमेश नायर (महायुती)
▪️ प्रभाग ३ – प्रीती सुर्वे, राजन शेट्ये (महायुती)
▪️ प्रभाग ४ – केतन शेट्ये, फौजिया मुजावर (महाविकास आघाडी)
▪️ प्रभाग ५ – सौरभ मलुष्टे, पूजा पवार (महायुती)
▪️ प्रभाग ६ – मेघा कुलकर्णी, राजीव किर (महायुती)
▪️ प्रभाग ७ – गणेश भारती, श्रद्धा हळदणकर (महायुती)
▪️ प्रभाग ८ – दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, नाहीदा सोलकर (महायुती)
▪️ प्रभाग ९ – सौ. सायली पाटील, विजय खेडेकर (महायुती)
▪️ प्रभाग १० – मानसी करमरकर, राजेश तोडणकर (महायुती)
▪️ प्रभाग ११ – समीर तिवरेकर, सुप्रिया रसाळ (महायुती)
▪️ प्रभाग १२ – राकेश नागवेकर, जागृती विलनकर (महायुती)
▪️ प्रभाग १३ (मिरकरवाडा) – आफ्रीन होडेकर, सुहेल साखरकर (महायुती)
▪️ प्रभाग १४ – संतोष किर, निवेदिता कळंबटे (महायुती)
▪️ प्रभाग १५ – वर्षा ढेकणे (महायुती), अमित विलणकर (महाविकास आघाडी)
▪️ प्रभाग १६ – रूक्सार खान, सोहेल मुकादम (महायुती)
राजकीय संदेश स्पष्ट
२९–३ असा हा निकाल रत्नागिरीच्या राजकारणात महायुतीच्या वर्चस्वाचा ठसा उमटवणारा असून, पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे. आगामी काळात रत्नागिरी शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.








