नगरपरिषद–नगरपंचायत निवडणूक निकाल : महायुतीचा राज्यभर दबदबा, भाजप आघाडीवर

मविआत काँग्रेसची सरशी

मुंबई, दि. २१ : राज्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून, या निकालात सत्ताधारी महायुतीने मोठे यश संपादन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांचे निकाल पाहता भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश असलेल्या महायुतीने राज्यभरात आपला दबदबा स्पष्टपणे सिद्ध केला आहे.

राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महायुतीतील पक्षांनी या निवडणुकीसाठी आक्रमक प्रचार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी राज्यभर सभा, प्रचार फेऱ्या घेत मतदारांशी थेट संवाद साधला. त्याचा परिणाम निकालात स्पष्टपणे दिसून आला. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप राज्यातील पहिला क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपचे तब्बल १२० नगराध्यक्ष निवडून आले असून, ही आतापर्यंतच्या नगरपालिका निवडणुकांमधील पक्षाची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व विभागांत भाजपने उल्लेखनीय यश मिळवले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही या निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. शिवसेना (शिंदे गट) ने राज्यातील ५४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद जिंकले आहे. सांगोला येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भाजप आणि शेकापच्या पॅनलला पराभूत करत लक्षवेधी विजय मिळवला. कोकणात शिवसेनेची ताकद अधिक वाढली असून रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले आणि निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. कोकण विभागात शिवसेनेचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सहा ठिकाणी, नाशिक जिल्ह्यात ११ पैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील पालघर आणि डहाणू येथेही शिवसेनेने आपला झेंडा फडकावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ४० नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो आणि यावेळीही त्यांनी तेथे आपली ताकद सिद्ध केली आहे. पुणे जिल्ह्यातील १७ नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी १० ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. एकेकाळी राष्ट्रवादीचा मजबूत गड मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आणि पाचगणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपद पटकावले आहे. कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यातही पक्षाला समाधानकारक यश मिळाले आहे.

महाविकास आघाडीच्या कामगिरीकडे पाहता, या आघाडीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक चांगली कामगिरी केल्याचे चित्र दिसते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ३४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने विशेष चांगली कामगिरी केली असून, अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

एकूणच या निकालातून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. मतदारांनी विकास, स्थिर प्रशासन आणि एकसंध नेतृत्वावर विश्वास दाखवला असल्याचे या निकालातून दिसून येत असून, आगामी काळात राज्याच्या राजकारणावर या निकालांचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा