जगात पुस्तकप्रेमी म्हणून ओळख असणाऱ्या आंबेडकरांनी मनुस्मृतीची जाहीर होळी का केली?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील थोर विचारवंत, अभ्यासक आणि पुस्तकप्रेमी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आयुष्यात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व होते. ज्ञान हीच खरी मुक्ती आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. हजारो ग्रंथांचे वाचन, विविध विषयांवरील सखोल अभ्यास आणि त्यातून निर्माण झालेली तर्कशुद्ध मांडणी हेच बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. अशा ग्रंथप्रेमी माणसाने एखाद्या धार्मिक ग्रंथाची जाहीरपणे होळी करावी, ही घटना अनेकांना आजही अस्वस्थ करते. म्हणूनच वारंवार हा प्रश्न विचारला जातो—जगात पुस्तकप्रेमी म्हणून ओळख असणाऱ्या आंबेडकरांनी मनुस्मृतीची जाहीर होळी का केली?

२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे झालेल्या ऐतिहासिक सत्याग्रहादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन केले. ही घटना केवळ एका पुस्तकाविरोधातील कृती नव्हती, तर ती हजारो वर्षे भारतीय समाजावर लादल्या गेलेल्या जातीय विषमता, अस्पृश्यता, स्त्रीदास्य आणि बहुजन समाजाच्या शोषणाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एका प्रचंड सामाजिक बंडाची घोषणा होती. मनुस्मृती हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो भारतीय समाजव्यवस्थेला गुलामगिरीत ठेवणाऱ्या विचारसरणीचा लिखित दस्तऐवज होता. त्यामुळे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ती ग्रंथद्वेषातून नव्हे, तर मानवमुक्तीच्या आड येणाऱ्या व्यवस्थेविरुद्धच्या संघर्षातून.

मनुस्मृतीमध्ये जन्मावर आधारित वर्णव्यवस्थेला नैसर्गिक, शाश्वत आणि अपरिवर्तनीय मानले गेले. माणसाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व त्याच्या जन्मावर ठरवले गेले. अस्पृश्यतेला धार्मिक आणि कायदेशीर अधिष्ठान देण्यात आले. बहुजन समाजाला शिक्षण, संपत्ती आणि सत्तेपासून कायम दूर ठेवण्याची रचना या ग्रंथातून निश्चित करण्यात आली. स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य नाकारण्यात आले, त्यांच्या सामाजिक श्रमांवर पुरुषांचा हक्क सांगण्यात आला आणि त्यांना आयुष्यभर पितृसत्ताक नियंत्रणाखाली ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अशा ग्रंथाला बाबासाहेबांनी नाकारले, कारण तो मानवतेच्या विरोधात होता.

आज अनेकांना वाटते की मनुस्मृती इतिहासजमा झाली आहे. समाज बदलला आहे, स्त्रिया शिकल्या आहेत, बहुजन समाजातील लोक शिक्षण, नोकरी, उद्योग-व्यवसायात पुढे गेले आहेत. बाह्यदृष्ट्या पाहता मनुस्मृती संपल्याचा भास निर्माण होतो. मात्र समाजाच्या खोल पातळीवर पाहिले तर मनुस्मृती आजही विविध रूपांत जिवंत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. सण-उत्सव, कर्मकांड, उपास-तापास, स्त्रीच्या त्यागी प्रतिमेचा गौरव, तिच्या शरीरावर आणि मनावर लादलेली धार्मिक बंधने—या सगळ्यात मनुस्मृतीचे अलिखित कायदे आजही कार्यरत आहेत.

दूरचित्रवाणीवरील मालिका या मनुस्मृतीच्या आधुनिक अवताराचे प्रभावी माध्यम बनल्या आहेत. या मालिकांमधून स्त्रीचे रंग, सौंदर्य, जात, चारित्र्य, कुटुंबातील स्थान यावर आधारित ठरावीक चौकटी सतत पुनरुत्पादित केल्या जातात. शिक्षित, नोकरी करणाऱ्या स्त्रिया दाखविल्या जात असल्या तरी त्यांचे मानसिक स्वातंत्र्य कायम नाकारले जाते. त्या कायम कट-कारस्थानांच्या, संशयाच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत अडकलेल्या दाखवल्या जातात. रामायण आणि महाभारतातील नायिका-खलनायिकांच्या प्रतिमांचे आधुनिक रूपांतर करून आजच्या स्त्रियांवर वर्णव्यवस्थेचे संस्कार लादले जातात.

एकीकडे ‘स्त्री शिकली, प्रगती झाली’ असे सांगितले जाते, तर दुसरीकडे तिला देव, धर्म, संस्कार, परंपरा यांच्या जोखडात अधिक घट्ट बांधले जाते. नवरात्रातील नऊ रंग, उपास-तापास, देवाच्या कृपेने संकट टळले, देवाच्या आशीर्वादाने यश मिळाले अशा कथनातून स्त्रीच्या मेंदूत मनुस्मृती कायम कोरली जाते. स्त्रीला बाह्य स्वातंत्र्य दिले जाते, पण वैचारिक स्वातंत्र्य मात्र नाकारले जाते.

लोकशाहीच्या चार स्तंभांची चर्चा मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्रत्यक्षात मात्र मीडिया हा लोकशाहीचा स्तंभ न राहता राजकीय आणि सांस्कृतिक सत्तेचा आधारस्तंभ बनत चालला आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यावरही मनुवादी विचारसरणीचा प्रभाव वाढताना दिसतो. त्यामुळे मनुस्मृतीला प्रश्न विचारणारे आवाज दुबळे केले जातात आणि समतेचा विचार मागे पडतो. आज देशात आणि राज्यात मनुवादी विचारांचे लोक सत्ताधारी आहेत. ही सत्ता केवळ राजकीय नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक आहे.

२५ डिसेंबर हा दिवस समतावादी विचारांचे भारतीय नागरिक मनुस्मृती दहन दिन, समानता दिन किंवा भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करतात. १९९६ पासून हा दिवस भारतीय महिला दिन म्हणून जाहीर व्हावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. डॉ. प्रमिला संपत यांच्या पुढाकाराने चंद्रपूर येथे पहिली दलित राष्ट्रीय महिला परिषद झाली आणि तेथून या मागणीला सुरुवात झाली. नंतर बाबासाहेब आंबेडकर प्रणित संस्था, संघटना आणि रिपब्लिकन महिला आघाडीने हा मुद्दा सातत्याने पुढे नेला.

महाड सत्याग्रहात मनुस्मृतीसह श्रुती, स्मृती आणि पुराणांना स्पष्टपणे नाकारण्याचा ठराव करण्यात आला होता. हा ठराव विनायक सहस्त्रबुद्धे यांनी मांडला आणि राजभोज यांनी त्याला अनुमोदन दिले. रात्री नऊ वाजता एका खड्ड्यात अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते मनुस्मृतीची जाहीर होळी करण्यात आली. हा क्षण भारतीय सामाजिक इतिहासातील क्रांतिकारक वळण ठरला. शांताराम पोतनीस, केशवराव देशपांडे, वामनराव पत्की, कमलाकर टिपणीस, सुभेदार घाडगे, रा. थोरात यांसारख्या बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी या सत्याग्रहासाठी प्राणपणाने मेहनत घेतली.

विरोधाभास असा आहे की २०१७ मध्ये मनुस्मृतीची नवी मराठी आवृत्ती खुलेआम बाजारात विकली गेली आणि ती खरेदी करणाऱ्यांत बहुसंख्य बहुजन समाजातील लोकच होते. बाबासाहेबांनी जी रचना बहुजनांचे हक्क, स्वातंत्र्य आणि माणूसपण नाकारणारी म्हणून जाळली, ती आज ‘अभ्यासासाठी’ विकत घेतली जाते. प्रत्यक्षात मात्र अभ्यास करायचा असेल तर मनुस्मृती नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन वाचले पाहिजे. त्यांनी लिहिलेल्या संविधानिक मूल्यांमध्येच खरी मुक्ती दडलेली आहे.

बॉब कट केस, जिन्स, टी-शर्ट घालणे म्हणजे स्त्रीमुक्ती नव्हे. स्त्री आज नोकरी करते, उद्योग करते, कला-कौशल्य दाखवते; पण तरीही ती लैंगिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या धर्मसंस्कारांच्या चौकटीबाहेर पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. गुरुवार, शुक्रवार, उपास-तापास, व्रते, नवस या सगळ्यांचे काटेकोर पालन केल्यावरच तिला समाजमान्य स्वातंत्र्य दिले जाते. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर स्त्रिया मनुस्मृती दहन दिन साजरा करताना दिसत नाहीत.

बहुजन समाजातील मराठा, ओबीसी, मागासवर्गीय समाज एकूण लोकसंख्येच्या सुमारे पंच्याऐंशी टक्के आहे. हा समाज शिक्षणाने पुढे जात असल्याचे दिसते, पण हजारो वर्षांचे संस्कार सहज नष्ट होत नाहीत. फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे घेतली जातात; जयजयकार केला जातो; पण खरी विचारधारा आचरणात उतरवली जात नाही. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी मनावरचे बंधन तोडण्याची तयारी समाजाने अजून दाखवलेली नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली ती केवळ त्या काळासाठी नव्हे, तर आज आणि उद्याच्या पिढ्यांसाठी. मनुस्मृती दहन हा केवळ कार्यक्रम म्हणून न पाहता वैचारिक प्रक्रिया म्हणून स्वीकारला गेला, तरच खऱ्या अर्थाने स्त्री आणि बहुजन समाज मुक्त होऊ शकतो. अन्यथा मनुस्मृती पुस्तकातून जरी जळाली असली, तरी समाजाच्या मनात ती कायम जिवंत राहील. आणि म्हणूनच आजही प्रश्न कायम आहे—जगात पुस्तकप्रेमी म्हणून ओळख असणाऱ्या आंबेडकरांनी मनुस्मृतीची जाहीर होळी का केली? कारण ती मानवतेच्या विरोधात होती, आणि मानवमुक्ती हाच बाबासाहेबांच्या जीवनाचा अंतिम उद्देश होता.

– सागर रामभाऊ तायडे
भांडुप मुंबई.
अध्यक्ष – सत्यशोधक कामगार संघटना, संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

आणखी वाचा