विवाह नोंदणी प्रक्रिया सोपी करण्याची मागणी ; सामाजिक कार्यकर्ते अमये परुळेकर यांचे नगरपरिषद प्रशासनाला निवेदन

रत्नागिरी, दि. २७ : रत्नागिरी नगरपरिषदेतील विवाह नोंदणी प्रक्रिया सध्या सर्वसामान्य नागरिकांसाठी गैरसोयीची ठरत असून ती तातडीने सोपी व सुटसुटीत करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमये परुळेकर यांनी केली आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

परुळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१५ ते १ जानेवारी २०२२ या सात वर्षांच्या कालावधीत रत्नागिरी नगरपरिषदेत केवळ १,२५१ विवाह नोंदणी झाल्या आहेत. ही संख्या अत्यंत कमी असून यामागे गुंतागुंतीची प्रक्रिया, वारंवार नगरपरिषदेत ये-जा करण्याची गरज आणि नियोजनाचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. विवाह नोंदणीसाठी नागरिकांना नगरपरिषदेत अनेक फेऱ्या माराव्या लागत असून त्यामुळे सर्वसामान्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी नवनियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून शहर विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्याचबरोबर नागरी सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी विवाह नोंदणीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगर हद्दीतील विवाह नोंदणीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा, अशी सूचनाही परुळेकर यांनी केली. हा अधिकारी संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकेल आणि विवाह प्रमाणपत्र घरपोच देऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आल्यास नागरिकांचा वेळ व श्रम वाचतील. तसेच नगरपरिषद कार्यालयातील गर्दीही कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ झाल्यास अधिकाधिक नागरिक नोंदणीस पुढे येतील आणि नगरपरिषदेलाही अधिक प्रभावी व पारदर्शक सेवा देता येईल, असा विश्वास अमये परुळेकर यांनी व्यक्त केला.

Oplus_16908288

आणखी वाचा