पोलादपूर, दि. २७ (शैलेश पालकर): गेल्या वर्षभरापासून आंबेनळी घाटामध्ये रस्तादुरूस्तीच्या कामामुळे रस्त्याची दैना झाली असून रस्त्याची परिस्थिती गंभीर केल्यामुळे ठेकेदार कंपनीवर कारवाई होत नाही उलट रस्त्याच्या अवस्थेकडे दूर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल होण्याच्या शक्यतेमुळे वाहनचालक हैराण झाल्याचे दिसून आले आहे. गुरूवारी सकाळी आंबेनळी घाटात सकाळच्या सुमारास टाटा नेक्सन कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने कारमधील बालकाने 112 नंबरला फोन लावल्याने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येऊन सर्वांचे जीव वाचविण्यात यश आले आहे.
आंबेनळी घाटातील वळणदार रस्ता आणि तीव्र उताराच्या भागात टाटा निक्सन कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. या अपघातानंतर कारमध्येच असलेल्या दहा वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून अपघाताची माहिती दिली. फोनवर लहान मुलाचा आवाज असल्याने सुरुवातीला अपघात सहलीच्या बसचा झाल्याची शंका निर्माण झाली. अपघाताचे नेमके ठिकाण स्पष्ट न समजल्यामुळे शोधकार्याला उशीर होऊ लागला आणि रेस्क्यूची सुरूवातच अपघातस्थळ शोधण्यापासूनच करावी लागली. त्यामुळे बस दरीमध्ये कोसळल्याच्या कोणत्याही खुणा न दिसल्याने कारच्या टायरच्या खुणांवरून घटनास्थळ निश्चित झाल्यानंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड सर्च ऍंड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खोल दरी, घनदाट जंगल आणि अत्यंत अवघड भौगोलिक परिस्थिती असूनही रेस्क्यू पथकांनी दोरखंड, सुरक्षा साधने आणि अन्य आवश्यक उपकरणांच्या सहाय्याने युध्दपातळीवर बचावकार्य राबवले. अपघातग्रस्त कारमधील एकूण पाच जणांपैकी दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या मोहिमेत अजित जाधव, आशिष बिरामणे, अनिकेत वागदरे, संकेत सावंत, ॠषिकेश जाधव, साई हवलदार, विक्रांत जाधव, सुनील बाबा भाटिया, सुजित कोळी, अमीत कोळी, अनिल केळगणे तसेच इतर सहकारी मित्रांनी विशेष मेहनत घेतली.
आंबेनळी घाटामध्ये सुरेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी या ठेकेदार कंपनीमार्फत घाटरस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून आधीचा घाटरस्ता अतिशय दूर्दशा झालेला दिसून येत आहे. महाराष्ट्र स्टेट इंन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत ठेकेदाराच्या कामादरम्यान घाटरस्ता धोकादायक होण्याबाबत कोणत्याही प्रकारे गांभीर्याने लक्ष पुरविण्यात आले नसल्याने घाटात अपघाताचे प्रमाण वाढून जीवघेण्या अपघातांनाही निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.
दापोली कृषी विद्यापिठाच्या बसचा अपघात ठेकेदार कंपनी आणि महाराष्ट्र स्टेट इंन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या विस्मरणात गेल्यानेच आंबेनळी घाटाच्या सुरक्षिततेकडे दूर्लक्ष केले जात असल्याचे अशा प्रसंगानंतर पोलादपूर, प्रतापगड तसेच महाबळेश्वर परिसरातील प्रवासी जनतेचे म्हणणे आहे.








