कोल्हापूर, दि. २७ : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी), कोल्हापूर यांनी मोठे यश मिळवले आहे. व्हेल माशाची प्रतिबंधित उलटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबरग्रीसची अवैध विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक करत पोलिसांनी तब्बल ५ कोटी २४ लाख ९० हजार रुपये किमतीची अंबरग्रीस जप्त केली आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करीचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक सक्रिय होते. याच दरम्यान अंमलदार परशुराम गुजरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत कणेरीवाडी (ता. करवीर) येथील विजयानंद पेट्रोल पंप परिसरात काही इसम अंबरग्रीस विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीनंतर एलसीबी व वन विभागाच्या संयुक्त पथकाने तात्काळ सापळा रचला. संशयास्पद हालचाली दिसताच दोन इसम चारचाकी वाहनातून, तर एक इसम मोपेडवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी पाठलाग करून खानविलकर नगर येथील मोकळ्या जागेत तिघांनाही ताब्यात घेतले. पंचासमक्ष तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून ५ किलो २४८ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) आढळून आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर पदार्थ अंबरग्रीस असल्याची अधिकृत खात्री दिली.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संभाजी श्रीपती पाटील (वय ७८, रा. चंद्रे, ता. राधानगरी), प्रमोद उर्फ पिंटू शिवाजी देसाई (वय ४८, रा. चिक्कल वहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) आणि अनिल तुकाराम महाडीक (वय ५५, रा. मुगळी, ता. गडहिंग्लज) अशी आहेत.
कारवाईदरम्यान अंबरग्रीससह मोपेड, चारचाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण ५ कोटी २८ लाख ६१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉ. व्ही. धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी कोल्हापूरच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध तस्करीविरोधात पोलिसांचा कडक पवित्रा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.








