मुंबई | BMC Election 2026
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने (VBA) अधिकृतपणे आघाडीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात मुंबईतील जागा वाटपाबाबत चर्चांचे फेरे सुरू होते. अखेर आज दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही आघाडी जाहीर केली. या आघाडीअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत आघाडीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “भारिपसोबत आमची पूर्वी आघाडी होती, मात्र 1999 नंतर राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र नव्हतो. तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहोत, याचा मला मनापासून आनंद आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. आमची आघाडी सत्तेसाठी नसून विचारांची आहे. हा संख्येचा खेळ नसून विचारांचा मेळ आहे. जागांपेक्षा विचारांना आम्ही अधिक प्राधान्य देतो.”
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आजपासून आम्ही दोन मित्रपक्ष आहोत, असे स्पष्ट करत सपकाळ यांनी भाजपविरोधात एकत्र लढण्याचा संदेश दिला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी युतीमागची भूमिका मांडताना सांगितले की, भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ऑनलाइन बैठकीत या युतीला मान्यता दिली असून मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 62 जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवेल, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेस मुंबईत नेमक्या किती जागांवर लढणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काँग्रेसने हा आकडा सध्या गुलदस्त्यात ठेवला असून शरद पवार गटासोबत जागा वाटपावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. राजकीय वर्तुळात चर्चेनुसार काँग्रेसने शरद पवार पक्षाला केवळ 9 जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस नेमकी किती जागांवर लढणार, याबाबत उत्सुकता कायम आहे.
या आघाडीच्या घोषणेसोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या लुकचीही जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या दोन दशकांत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनीही विविध टप्प्यांवर हा प्रयत्न केला, मात्र गणित जुळले नव्हते. अखेर हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हे युतीचे गणित यशस्वी ठरले.
गांधी टोपी, नेहरू जॅकेट आणि धोतर या पारंपरिक वेशात सपकाळ यांनी आघाडीची घोषणा केल्याने त्यांच्या लुकचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. या युतीमुळे मुंबईत काँग्रेसला आपले राजकीय प्राबल्य वाढवता येईल की नाही, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र, संकेत स्पष्ट आहेत की 2026 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे ताकदीनिशी मैदानात उतरायला सज्ज झाली आहे.








