मुंबई, दि. २८ : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध पक्षांमध्ये युती, आघाडी आणि जागावाटपावरून जोरदार हालचाली सुरू असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिक आक्रमक होताना दिसत आहे. महायुतीसोबतची चर्चा अद्याप अंतिम टप्प्यावर पोहोचलेली नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर मोठ्या संख्येने जागा लढवण्याची तयारी दर्शवली आहे. वेळ आलीच तर आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 100 जागा लढवण्यास सज्ज आहोत, असा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांच्याकडे सोपवल्यानंतर महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. विशेषतः भाजपाकडून यावर उघड नाराजी व्यक्त करण्यात आली असून नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली तर त्यांच्यासोबत जाणार नाही, अशी भूमिका भाजपाने जाहीरपणे घेतली आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम आणि भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नवाब मलिक यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याने पक्षाने त्यांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केल्याचे संकेत मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर वृत्तवाहिनीसोबत बोलताना आमदार सना मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, महायुती होणार की नाही, याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या चर्चांमधूनच होईल. मात्र, एक कार्यकर्ता म्हणून मी आणि आमचा संपूर्ण पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. जर वेळ आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेच्या 100 जागा लढवण्याच्या तयारीत आहे.
सना मलिक यांनी पुढे सांगितले की, सध्या मुंबईतील महायुतीबाबत चर्चा सुरू आहेत आणि येत्या काही दिवसांत त्यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्याचबरोबर पक्षांतर्गत तयारीही वेगाने सुरू आहे. मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असून वेगवेगळ्या विभागांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून निवडणुकीच्या तयारीसाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उमेदवारांच्या बाबतीतही पक्षाने जवळपास तयारी पूर्ण केल्याचा दावा सना मलिक यांनी केला. अधिकृत यादी अद्याप जाहीर झाली नसली तरी बहुतांश उमेदवार निश्चित झाले असून अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव, निवडणूक प्रक्रियेची तयारी आणि इतर प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. पक्षश्रेष्ठींकडून आदेश मिळताच आमचे उमेदवार तत्काळ संपूर्ण तयारीनिशी अर्ज दाखल करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागले आहे. सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्तेत असून ती सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
मात्र, नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. भाजपाच्या स्पष्ट विरोधानंतरही अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपवली असून त्यांना स्टार प्रचारक म्हणूनही पुढे केलं आहे. यामुळे आगामी काळात मुंबईतील महायुतीचं गणित नेमकं कसं बसेल, आणि राष्ट्रवादी काँग्रेस खरंच 100 जागांवर मैदानात उतरणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.








