अमरावती, दि. २८ : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा कणा ठरलेली आणि देशाच्या राजकारणात दीर्घकाळ निर्णायक भूमिका बजावलेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आज १४० वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण करत आहे. २८ डिसेंबर १८८५ रोजी स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाने ब्रिटिश सत्तेविरोधातील संघर्षापासून आधुनिक लोकशाही भारताच्या घडणीपर्यंतचा प्रदीर्घ आणि संघर्षमय प्रवास केला. या निमित्ताने काँग्रेसची स्थापना, तिची ऐतिहासिक भूमिका आणि बदलत गेलेला प्रवास इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी उलगडून सांगितला.
ब्रिटिश धोरणातून काँग्रेसचा जन्म
१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना भारतातील असंतोषाची तीव्रता लक्षात आली. पंजाबमध्ये रामसिंग कुका यांची चळवळ, महाराष्ट्रात बळवंत फडके यांचा सशस्त्र संघर्ष अशा घडामोडींमुळे इंग्रज अधिक सावध झाले. पुन्हा १८५७ सारखा व्यापक उठाव झाला, तर भारतावर आपली सत्ता टिकणार नाही, याची जाणीव ब्रिटिशांना झाली. त्यामुळे भारतीय असंतोषाला हिंसक मार्गापेक्षा कायदेशीर आणि नियंत्रित वाट मिळावी, या उद्देशाने एक राष्ट्रीय संघटना निर्माण करण्याचा विचार पुढे आला.
याच पार्श्वभूमीवर व्हॉइसरॉय लॉर्ड डफरीन यांच्या काळात आयएएस अधिकारी ॲलन ऑक्टिव्हियन ह्यूम यांनी भारतीय नेत्यांशी चर्चा करून एका राष्ट्रीय संघटनेची संकल्पना मांडली. कलकत्ता येथे एका पदवीदान समारंभात त्यांनी इंग्लंडमधील विरोधी पक्षाच्या धर्तीवर भारतातही अशीच संघटना असावी, अशी कल्पना मांडली. अखेर २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. अमेरिकेतील लोकप्रतिनिधी सभेवरून ‘काँग्रेस’ हे नाव देण्यात आले. ‘काँग्रेस’ म्हणजे लोकांचे मंडळ, असा अर्थ असल्याचे प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी स्पष्ट केले.
पहिलं अधिवेशन आणि वाढता प्रभाव
काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्याच दिवशी पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलं. देशभरातून विविध जाती-धर्मांचे ७२ प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित होते. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. सुरुवातीच्या काळात काँग्रेस ही संघटना आपल्याला पूरक ठरेल, असं इंग्रजांना वाटत होतं. पुढील काळात काँग्रेसची अधिवेशनं देशातील विविध शहरांमध्ये होऊ लागली. या माध्यमातून शिक्षित भारतीय नेते देशभर फिरू लागले. त्यांना विविध प्रांतांतील समस्या, लोकांचे दुःख, सामाजिक-आर्थिक प्रश्न यांची जाणीव होऊ लागली आणि त्यातूनच काँग्रेसचा दृष्टिकोन अधिक व्यापक आणि राष्ट्रवादी होत गेला. हळूहळू काँग्रेस ब्रिटिश सत्तेविरोधातील प्रमुख राजकीय व्यासपीठ ठरली.
काँग्रेसचे तीन महत्त्वाचे टप्पे
काँग्रेसच्या इतिहासात तीन महत्त्वाचे कालखंड मानले जातात. पहिला टप्पा म्हणजे १८८५ ते १९०५ या काळातील मवाळ राजकारण. या काळात दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, बदरुद्दीन तय्यबजी, फिरोजशहा मेहता यांसारख्या नेत्यांनी घटनात्मक मार्ग स्वीकारला. अर्ज, निवेदन, चर्चांच्या माध्यमातून सुधारणा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आर्थिक शोषणाविरोधात आवाज उठवणे आणि शिक्षण व प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढवणे हे या टप्प्याचे वैशिष्ट्य होते. मात्र, ही संयमी भूमिका अनेक तरुण आणि आक्रमक नेत्यांना अपुरी वाटू लागली.

१९०५ नंतर काँग्रेसमध्ये जहाल विचारांचा उदय झाला. बंगालच्या विभाजनाविरोधातील आंदोलनामुळे राष्ट्रवादी चळवळीला नवी धार मिळाली. लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल आणि लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याची मागणी उघडपणे मांडली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हा लोकमान्य टिळकांचा नारा या काळात राष्ट्रीय चळवळीचा घोष बनला. या टप्प्यात काँग्रेस अधिक लोकाभिमुख आणि आक्रमक झाली.
तिसरा आणि निर्णायक टप्पा म्हणजे गांधी युग. १९२० नंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पूर्णतः जनआंदोलनात रूपांतरित झाली. असहकार चळवळ, कायदेभंग आंदोलन आणि १९४२ चे ‘छोडो भारत’ आंदोलन यांमुळे ब्रिटिश सत्तेच्या मुळावर घाव घालण्यात आला. १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने पहिल्यांदाच पूर्ण स्वातंत्र्याची अधिकृत मागणी केली. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व यशस्वीरित्या पूर्णत्वास नेले.
स्वातंत्र्यानंतरचा दीर्घ सत्ताकाळ
स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसने दीर्घकाळ देशाचे नेतृत्व केले. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक भारताची पायाभरणी झाली. नियोजन आयोगाची स्थापना, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार, वैज्ञानिक प्रगती, शिक्षणव्यवस्थेचा विकास आणि लोकशाही मूल्यांची घडण या काळात झाली. आज काँग्रेससमोर अनेक राजकीय आव्हाने असली, तरीही भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा, सक्रिय आणि ऐतिहासिक पक्ष म्हणून काँग्रेसचे स्थान कायम आहे, असे मत प्रा. डॉ. वैभव म्हस्के यांनी व्यक्त केले.








