निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि शांत वातावरण… नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण पर्यटकांनी फुलून गेला

रत्नागिरी, दि. २८ : सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी यंदा कोकण पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे. निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवीगार डोंगररांग, शांत वातावरण आणि तुलनेने परवडणारी पर्यटनस्थळे यामुळे मुंबईकरांसह राज्याच्या विविध भागांतील हजारो पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. नाताळच्या सुट्ट्यांपासून सुरू झालेला पर्यटकांचा ओघ थेट नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहणार असल्याचे चित्र आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रमुख पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी अक्षरशः गजबजून गेली आहेत.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन–दिवेआगर, अलिबाग, मुरुड-जंजिरा ही ठिकाणे पर्यटकांच्या गर्दीमुळे विशेष चर्चेत आहेत. दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पर्यटकांची वर्दळ दिसून येत असून कुटुंबीय, मित्रपरिवार आणि तरुणाई मोठ्या संख्येने येथे दाखल झाली आहे. स्वच्छ वाळू, निळेशार समुद्र आणि मोकळं वातावरण यामुळे पर्यटक सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत. पॅरासेलिंग, जेट स्की, बोट राईड यांसारख्या जलक्रीडांना मोठा प्रतिसाद मिळत असून संपूर्ण किनारपट्टी उत्साहाने भरलेली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, दापोली, गुहागर या पर्यटनस्थळांवरही मोठी गर्दी आहे. गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि तारकर्ली येथे स्कूबा डायव्हिंग आणि वॉटरस्पोर्ट्ससाठी तरुणाईची मोठी गर्दी होत आहे. डॉल्फिन सफारीचा अनुभव घेण्यासाठीही पर्यटक उत्सुक असून अनेक ठिकाणी बोटींची गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईजवळची पर्यटनस्थळे असल्यामुळे अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि दिवेआगर येथे मुंबईकरांचा सर्वाधिक राबता दिसून येतो.

पर्यटकांच्या विक्रमी गर्दीचा थेट परिणाम स्थानिक पर्यटन व्यवसायावर झाला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील बहुतांश हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होमस्टे आणि फार्महाऊस ८० ते ९० टक्के आरक्षित झाले असून अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चे फलक लागले आहेत. काही ठिकाणी आगाऊ बुकिंगशिवाय खोल्या मिळणे कठीण झाले आहे. मध्यमवर्गीय पर्यटकांनी महागड्या हॉटेल्सपेक्षा स्थानिक होमस्टेला अधिक पसंती दिल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. वाढत्या मागणीमुळे काही पर्यटनस्थळांवर निवासाचे दर सुमारे २० टक्क्यांनी वाढल्याचेही चित्र आहे.

कोकणातील पर्यटन केवळ निसर्गापुरते मर्यादित न राहता स्थानिक खाद्यसंस्कृतीमुळेही आकर्षण ठरत आहे. अस्सल मालवणी जेवण, ताजी मासळी, सोलकढी, भाकरी, कोकणी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. काजू, कोकम सरबत, आंबा प्रक्रिया पदार्थ आणि कोकणी मेव्याची विक्री दुप्पट झाली असून स्थानिक शेतकरी, विक्रेते आणि हस्तकला कारागिरांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. या सुट्टीच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याचे संकेत पर्यटन व्यावसायिकांकडून दिले जात आहेत.

दरम्यान, पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे मुंबई–गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे सुरू असलेले काम आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे काही भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, रेल्वे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून अनेक पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रमुख चौकांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर प्रशिक्षित लाइफगार्ड, सुरक्षा रक्षक आणि जलक्रीडा व्यवस्थापक तैनात करण्यात आले आहेत. समुद्रात उतरताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पर्यटकांना करण्यात येत असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सतत नजर ठेवली जात आहे. स्थानिक पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत आणि पर्यटन व्यावसायिकांच्या समन्वयातून पार्किंग व्यवस्था, स्वच्छता आणि वाहतूक नियोजनावर विशेष लक्ष दिले जात आहे.

यंदाच्या पर्यटन हंगामात सुमारे ८ ते १० लाख पर्यटक कोकणात येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे स्थानिक वाहतूकदार, रिक्षाचालक, मच्छीमार, हॉटेल व्यावसायिक आणि छोटे दुकानदार यांना मोठा फायदा होत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, गोंगाटापासून दूर राहून नववर्ष साजरे करण्याची संधी कोकण देत असल्याने परदेश किंवा गोव्याऐवजी अनेक पर्यटकांनी यंदा कोकणालाच पसंती दिली आहे.

एकूणच, ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी पर्यटकांनी फुलून गेली असून पर्यटन उद्योगासाठी हे वर्ष अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे.

आणखी वाचा