भीमा कोरेगाव विजय स्तंभ : संघर्षाचा त्रिकोण — सरकार, पोलीस आणि भीमसैनिक

भीमा कोरेगाव विजय स्तंभ हा केवळ एक दगडी स्मारक नाही; तो शोषित, वंचित आणि अन्यायाविरुद्ध लढलेल्या महार सैनिकांच्या शौर्याची जिवंत साक्ष आहे. १ जानेवारी १८१८ रोजी पेशवाईच्या अन्यायी सत्तेला दिलेला पराभव हा इतिहासातील एक निर्णायक क्षण होता. मात्र आज, दोनशे वर्षांनंतरही हा विजय सहज स्वीकारला गेलेला नाही. उलट, भीमा कोरेगाव आजही संघर्षाच्या केंद्रस्थानी उभा आहे—आणि हा संघर्ष आहे सरकार, पोलीस आणि भीमसैनिक यांच्यातील त्रिकोणी संघर्षाचा.

आजच्या राजकीय वास्तवात सरकार म्हणजे केवळ एक प्रशासकीय यंत्रणा राहिलेली नाही. सरकार म्हणजे सत्ताधारी राजकीय पक्ष, त्यांचे वैचारिक वारसदार आणि त्यांना साथ देणारे भांडवलदारांचे हितसंबंध. हे सरकार धोरण ठरवते, आदेश देते. त्या आदेशांची अंमलबजावणी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा करते. आणि या संपूर्ण प्रक्रियेला प्रश्न विचारतो, विरोध करतो, अन्यायाविरुद्ध उभा राहतो—तो म्हणजे सामान्य नागरिक, कामगार, शेतकरी आणि विशेषतः भीमसैनिक.

सरकारी यंत्रणा आज नागरिकांची सेवा करणारी व्यवस्था न राहता अनेकदा नागरिकांवर नियंत्रण ठेवणारी, त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण करणारी व्यवस्था बनल्याचा अनुभव सर्वसामान्यांना येतो. सरकारी कार्यालयात साधे कामही ‘चिरीमिरी’शिवाय होत नाही, ही कटू वस्तुस्थिती आहे. नाही दिली, तर कागदांतील चुका, नियमांचे जाळे आणि कार्यालयीन फेऱ्या—यामुळे वेळ, पैसा आणि रोजगार सगळेच बुडतात. अशा वेळी नागरिक हतबल होतो.

मात्र, एकटा नागरिक संघर्ष करू शकत नाही. पण एक भीमसैनिक उभा राहतो—भीती न बाळगता, परिणामांची पर्वा न करता. आणि पाहता पाहता हजारो, लाखो भीमसैनिक त्याच्या पाठीशी उभे राहतात. तेव्हा ती एका व्यक्तीची समस्या राहत नाही; ती समाजाची चळवळ बनते. म्हणूनच सत्तेला भीमसैनिकांची एकजूट अस्वस्थ करते.

विजय स्तंभाची जमीन : दुर्लक्षित वास्तव

भीमा कोरेगाव विजय स्तंभ आणि त्याच्या परिसरातील सुमारे पावणे दहा एकर जमीन हा मुद्दा अनेकांना माहीतच नाही. ही जमीन आजही माळवदकर कुटुंबाच्या ताब्यात आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे दरवर्षी १ जानेवारीला केवळ एक दिवसासाठी मानवंदना देण्याची परवानगी मिळते आणि नंतर पुन्हा त्या जमिनीचा ताबा मूळ मालकांकडे जातो. वर्षभर त्या जमिनीवर शेती केली जाते—हे वास्तव ९९ टक्के लोकांना माहीत नाही. आणि ज्यांना माहीत आहे, तेही मौन बाळगून आहेत.

या अन्यायाविरुद्ध गेली पंधरा वर्षे दादाभाऊ अभंग यांच्या नेतृत्वाखाली भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण व संवर्धन समिती न्यायालयीन व प्रशासकीय लढा लढत आहे. अनेक वेळा न्यायालयीन निकाल समितीच्या बाजूने लागले आहेत. तरीही व्यापक पातळीवर समाजाची संघटित साथ या लढ्याला मिळत नाही, ही खंत आहे.

लाखो लोक दरवर्षी एक दिवस विजय स्तंभाला मानवंदना देतात, पण उरलेल्या ३६४ दिवसांत त्या ऐतिहासिक स्थळाचे काय चालले आहे, याकडे दुर्लक्ष करतात. इतिहास जपायचा असेल, तर केवळ भावना नव्हे—तर संघटित प्रशासकीय व न्यायालयीन संघर्ष आवश्यक आहे.

२०१८ : इतिहासावर हल्ला

१ जानेवारी २०१८ रोजी, दोनशे वर्षांच्या स्मृतिदिनाला जे घडले, ते केवळ दंगल नव्हती; तो इतिहास पुसण्याचा प्रयत्न होता. मनोहर भिडे यांच्याशी संबंधित, जगदंब जॉकेट घातलेल्या टोळक्यांनी शेतात लपून दगडफेक करत निष्पाप भीमसैनिकांवर जीवघेणा हल्ला केला. त्या वेळी पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद होती, हे देशाने पाहिले.

यानंतर ३ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या महाराष्ट्र बंदने हा मुद्दा जागतिक पातळीवर पोहोचवला. सोशल मीडियामुळे भीमा कोरेगावचा इतिहास घराघरात पोहोचला. बहुसंख्य मराठा, ओबीसी समाजालाही हा इतिहास नव्याने समजू लागला आणि त्यांची उपस्थिती भीमा कोरेगावमध्ये वाढू लागली. ही वाढती संख्या पाहूनच आज नव्या पद्धतीने रोखण्याचे षड्यंत्र आखले जात आहे—पार्किंग पाच-सात किलोमीटर दूर ठेवणे, वयोवृद्ध व महिलांना त्रास होईल अशी व्यवस्था करणे.

परंपरा मोडण्याचे प्रयत्न

विजय स्तंभ परिसरात ३७ वर्षांची परंपरा असलेल्या अभिवादन सभा आधीच बाहेर काढण्यात आल्या. आता मानवंदना रॅलीलाच ‘त्रासदायक’ ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली आंबेडकरी परंपरा मोडीत काढण्याचा हा डाव आहे. दुर्दैव म्हणजे, यासाठी समाजातीलच काही लोकांचा वापर केला जातो.

तरीही, इतिहास साक्ष देतो की—दीक्षाभूमी, चैत्यभूमी, चवदार तळे आणि भीमा कोरेगाव येथे मतभेद विसरून लाखो आंबेडकरी एकत्र येतात. हीच एकजूट सत्तेला अस्वस्थ करते.

आत्मचिंतनाची गरज

१८१८ मध्ये केवळ ५०० महार सैनिकांनी २८,००० पेशवाई सैनिकांना पराभूत केले—हा इतिहास धैर्य, संघटन आणि नेतृत्वाचा आदर्श आहे. पण आज आपण त्या आदर्शातून काय शिकतो? गटबाजी, “मी मोठा की तू मोठा” या अहंकारामुळे आपणच आपली ताकद कमी करत नाही ना—हा प्रश्न प्रत्येक भीमसैनिकाने स्वतःला विचारायला हवा.

भीमा कोरेगावचा संघर्ष आजही थांबलेला नाही. तो सरकार, पोलीस आणि भीमसैनिक यांच्यातील त्रिकोणात अडकलेला आहे. हा संघर्ष केवळ एका दिवसापुरता न ठेवता, वर्षभर चालणाऱ्या सजग लढ्यात रूपांतरित करणे, हीच काळाची गरज आहे.

इतिहास वाचला तर इतिहास घडवता येतो.
मग आज, आत्ता—आपण काय करतो आहोत?

भीमा कोरेगाव संघर्षातील ज्ञात-अज्ञात शहीदांना मानाचा मुजरा.
जय भीम. जय संविधान.

-सागर रामभाऊ तायडे,
९९२०४०३८५९,
भांडूप मुंबई.

आणखी वाचा