माझ्या शिकल्या -सवरलेल्या लेकींना बघून मला खूप आनंद होतोय .काळ कसाच मागे पडला काहीच कळले नाही. आमचा काळ फार संघर्षाचा होता. दारिद्र्य, दुःख आमच्या पाचवीला पुजलेले होते पण महात्मा फुले यांच्या साथीने जीवन प्रवास सहज झाला. मला लिहिता वाचता आले .लोकांनी शेण- शिंतोडे उडवले पण त्यातून नव्या उमेदीने समाजासाठी उभे राहण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या शिक्षणातून समाजाचे शिक्षण होईल हे न कळणारी मी फुल्यांनी मला घडविले. अनंत त्यांचे उपकार या माऊलीवर! असेच मी म्हणेन.
मला आठवतंय फुल्यांनी जेव्हा भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा केवढा जनक्षोभ उसळला होता. तो दिवस होता १, जानेवारी १९४८ चा. नव्या शाळेत नव्या मुलींच्या पाटीवर अ ,आ गिरवताना मनाला झालेला आनंद गगनात मावेनासा होता. आता तर तुम्ही धडेच्या धडे लिहू लागला आहात.

आज सर्व क्षेत्रात तुम्ही गगन भरारी घेतली आहे. गृहिणी म्हणून तुम्हाला उत्तम स्वयंपाक येतो. डॉक्टर होऊन तुम्ही रुग्णांची सेवा करताय .इंजिनीयर होऊन सुंदर घरे बांधताय. राजकारणातला तुमचा प्रवास थेट राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचलाय. राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या रूपाने देशाला स्त्री प्रतिनिधित्व मिळाले .पंतप्रधान इंदिरा गांधींच्या रूपाने देश प्रगतीपथावर पोहोचला. नारी शक्तीच्या बळावर आपण चंद्रावर जाऊन पोहोचलो .तुमच्यातल्या प्रचंड ऊर्जेला नवी ताकद मिळाली हे बघून डोळ्यात आनंदाश्रू येताहेत.
एक काळ स्त्रियांनी सती जाण्याचा, केशवपनाचा, स्त्री हत्येचा,बालविवाहाचा ,जातीभेद, लिंगभेदाचा होता. सध्याचा काळ औद्योगिक क्रांतीचा ,शिक्षणाचा समाजकारण, अर्थकारण ,राजकारण ,विज्ञान-तंत्रज्ञान कला -क्रीडा ,साहित्याचा आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही मुलींनी आपला ठसा उमटवला आहे. भूदल, नौदल, वायुदलात भरती होऊन भारतमातेच्या संरक्षणार्थ या लेकी लढताना बघून माझा ऊर भरून येतोय.
मुलींनो, आता मागे वळून बघू नका. घरदार सांभाळत या देशाला नवीन बळ देण्याचे कार्य तुमच्या हातून होणार आहे ;म्हणूनच पाय मजबूत करा .वाकडी पावलं टाकू नका .व्यसनाच्या आहारी जाऊ नका. देहविक्री करू नका. लांडी -लबाडी सोडून द्या. लेकी -बाळींना शिकवा. चोरी- मारी करू नका. खोटं बोलू नका. मुलांवर प्रेम करा. अनैतिक मार्गाला जाऊ नका. स्वतःच्या संरक्षणार्थ स्वतः सिद्ध व्हा .स्वरक्षणाची प्रशिक्षण घ्या .दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.
स्वावलंबनाबरोबरच स्वाभिमानी व्हा .अहंकाराला दूर ठेवा. कुणाची उणी -दुणी काढू नका. वेळेचा सदुपयोग करा. भरपूर शिका. लिहा -वाचा सजग रहा. लोकसेवेचा मार्ग हा ईश्वर प्राप्तीचा उत्तम मार्ग आहे .गोरगरिबांना मदत करा .त्यांना आपलंसं करा. कोणावर टीका करू नका. कोणाचा मत्सर- द्वेष करू नका. तुमच्यातल्या मायेने जगाला सावली देण्याचे काम करा.
फुल्यांनी मला जो जीव लावला ,त्यातून माझं जीवन सार्थकी लागलं. मी भाग्यवंत ठरले. तुम्ही तर भाग्यविधात्या आहात. देश तुम्हाला चालवायचा आहे .भारतमातेला तुमच्यासारख्या लेकींची सोबत हवी आहे .शत्रू कितीही बळकट असला तरी तुमच्यापुढे तो टिकणार नाही; त्याला नेस्तनाबूत करण्याची ताकद तुमच्या मनगटात आहे .याची मला खात्री आहे.
माझे आशीर्वाद कायमच तुमच्या सोबत आहेत .प्रत्येक घरात एक सावित्री जन्माला आली आहे. मी तुमच्यातच आहे .एक करा सावित्रीचा विचार मरू देऊ नका. सावित्रीला घराघरात पोहोचवण्याचे काम मी तुमच्यावर सोपवले आहे.तेवढे जरूर करा.

— श्रीमती. मानसी मंगेश चव्हाण
९१३०६६९५६५








