ठाणे, दि. १० (प्रतिनिधी): ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून प्रचाराची धग शिगेला पोहोचली आहे. अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक १३, विभाग ‘ड’ मधून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल कदम यांनी आपल्या वेगळ्या शैलीच्या प्रचारामुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. सेवाभावी प्रतिमा, थेट संवाद आणि ज्वलंत प्रश्नांवर स्पष्ट भूमिका यामुळे त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळत आहे.
प्रफुल्ल कदम हे कोकणाचे सुपुत्र असून त्यांनी आजवर सामाजिक कार्य करताना कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता काम केले आहे. शारीरिक शिक्षण शिक्षक व कराटे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी तरुणांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. सामान्य नागरिकांचा दबलेला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठीच आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे ते सांगतात.
प्रचारादरम्यान बोलताना प्रफुल्ल कदम यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न हा ठाणे व मुंबई परिसरातील सर्वांत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगितले. या प्रश्नावर संघर्ष करावा लागणार असून, हा काळ लढ्याचा आहे. एकजुटीने लढलो तर न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुख-दुःखात कायम पाठीशी उभा राहणारा, खंबीर आणि संवेदनशील प्रतिनिधी निवडावा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

हा संघर्ष सत्तेच्या सुखासाठी नसून हक्क, न्याय आणि सन्मानासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी आपण दाखवू, असा शब्द त्यांनी दिला. प्रफुल्ल कदम यांची ‘केक’ ही निवडणूक निशाणी असून, मोठ्या संख्येने मतदान करून पाठिंबा द्यावा, असे नम्र आवाहन त्यांनी केले आहे.
नियोजित उद्दिष्टे, सातत्यपूर्ण प्रचार आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे अपक्ष उमेदवारही निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात, हे प्रफुल्ल कदम यांच्या प्रचारातून दिसून येत आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला मतदारांकडून निश्चितच पाठबळ मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.








