स्वतंत्र मराठी भाषा विभाग ते बेस्टमध्ये महिलांना ५०% सवलत; मुंबईकरांसाठी महायुतीच्या घोषणांची खैरात

मुंबई, दि. ११ : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असतानाच भाजपा–शिवसेना महायुतीकडून मुंबईकरांसाठी मोठ्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. मुंबईकरांनी दिलेल्या तब्बल २.६५ लाख सूचनांचा विचार करून महायुतीचा जाहीरनामा (वचननामा) रविवारी (११ जानेवारी) बीकेसी येथील एमसीए क्लबमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष उपक्रमांची घोषणा करत ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडले. “बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा विसर विरोधकांना पडला आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर बोलताना “धारावीकरांना धारावीतच घरे मिळणार असून मुंबई तोडली जाणार, हे विरोधकांचे बिनबुडाचे आरोप आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईकरांच्या जीवनात बदल घडवण्याचे वचन – शिंदे
वचननाम्याची घोषणा करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे वचन देतो. मुंबईच्या विकासासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. गेल्या काही वर्षांत मुंबई सोडून नालासोपारा, विरार, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथपर्यंत गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही मुंबई पागडीमुक्त करण्याचा निर्णय घेतला. ओसी न मिळणे, वाढलेली पाणीपट्टी यासारख्या समस्यांना आम्ही आळा घातला. झोपडपट्टीमुक्त मुंबई हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये एसआरएच्या माध्यमातून १५ हजारांहून अधिक घरे उभारली जात आहेत. गिरणी कामगारांसाठी १५० कोटींची तरतूद करून घरे देण्यात येत आहेत. येत्या काळात मुंबई व एमएमआरमध्ये २० ते ३५ लाख घरे बांधली जाणार असून लाखो तरुणांना रोजगार मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त विशेष योजना
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. यामध्ये बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठाची स्थापना, महिलांसाठी बेस्ट बस भाड्यात ५० टक्के सवलत, लघु उद्योजकांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात अडथळे न आणता पुढील पाच वर्षे पाणीपट्टी वाढीला स्थगिती यांचा समावेश आहे.

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवणार – फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “इतर कुणीही वचननामा दिला तरी आमचा ट्रॅक रेकॉर्ड सर्वांत भक्कम आहे. पुढील पाच वर्षांत आम्ही काय केलं, याचा स्वतंत्र अहवाल मुंबईकरांसमोर मांडू. आम्ही मुंबईकरांना कधीही मुंबईबाहेर जाण्यास भाग पाडणार नाही. बीडीडी चाळ, अभ्युदयनगर, सह्याद्रीनगर ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. धारावी पुनर्विकासात ३५० चौ. फूटापर्यंतची घरे धारावीतच दिली जातील. महापालिका शाळांचे सक्षमीकरण, सफाई कामगारांसाठी घरे आणि मराठी भाषेसाठी विशेष तरतूद केली जाणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

महायुतीच्या वचननाम्यातील ठळक घोषणा
महायुतीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना, मराठी कला केंद्र व अभ्यासिकेची उभारणी, पर्यटन विभागाची निर्मिती, हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचे संग्रहालय, नाट्यगृहांचा पुनर्विकास व नवीन नाट्यगृहांची उभारणी, २०३४ चा विकसित मुंबई आराखडा, पाणीपुरवठ्यासाठी गारगाई, पिंजाळ व दमणगंगा प्रकल्पांची पूर्तता, पर्यावरण संवर्धनासाठी १७ हजार कोटींची तरतूद यांचा समावेश आहे.

याशिवाय बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस, महिलांना ५० टक्के सवलत, बसेसची संख्या ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत वाढवणे, स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर, लाडक्या बहिणींसाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, तसेच रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करण्याची घोषणाही वचननाम्यात करण्यात आली आहे.

महायुतीच्या या घोषणांमुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

आणखी वाचा