चिपळूण, दि. ३० : महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपासून राजकारणी आणि पोलीस प्रशासनातील व्यक्तींपर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या TWJ कंपनीच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कंपनीचा मालक व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमित पालम यांना शुक्रवारी अटक केली. राज्यभर गाजलेल्या या घोटाळ्याची रक्कम सुमारे १,२०० कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
TWJ कंपनीने विविध आकर्षक योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अवास्तव परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात उघड झाले आहे. सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, त्यानंतर अचानक कंपनीने व्यवहार बंद केल्याने हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं.
तपासाला वेग
या प्रकरणात काही दिवसांपूर्वी रत्नागिरी पोलिसांनी TWJ कंपनीच्या एका संचालकाला अटक केल्यानंतर तपासाला गती मिळाली होती. दरम्यान, फसवणूक उघडकीस येताच समीर नार्वेकर महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेत ही मोठी कारवाई केली.
आणखी धक्कादायक खुलास्यांची शक्यता
TWJ कंपनी घोटाळ्यात अनेक मोठ्या व्यक्तींची गुंतवणूक असल्याची चर्चा असून, काही संचालक, एजंट आणि स्थानिक मध्यस्थांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू असून, फसवणुकीचा नेमका आकडा आणि आर्थिक व्यवहारांची साखळी लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.
आणखी अटक संभव
मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर आणि त्याची पत्नी नेहा नार्वेकर यांना अटक झाल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, येत्या काळात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.








