मुंबई, दि. ३१ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आता त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार स्वीकारणार असून, आज सायंकाळी ५ वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीमुळे सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून इतिहास घडवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर हा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. पक्षातील बहुसंख्य आमदारांनी सुनेत्रा पवार यांनीच ही जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयास मान्यता दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिल्याने आज विधिमंडळ पक्षाची बैठक आणि शपथविधी आयोजित करण्यात आला आहे.
विधानभवनात होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता राजभवनात अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी होणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील आणखी एक मंत्रिपद रिक्त असले तरी आज केवळ सुनेत्रा पवार यांचाच शपथविधी पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात दहा जणांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. मात्र, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाचा पुढचा अध्याय कोण लिहिणार, असा प्रश्न संपूर्ण राज्यासमोर उभा राहिला होता. सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीमुळे या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून, त्यांच्यामार्फत पवार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालवला जाणार आहे. या नेमणुकीला दुर्दैवाची पार्श्वभूमी असली तरी, महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
सुनेत्रा पवार यांचे पूर्वाश्रमीचे आडनाव पाटील असून त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव (उस्मानाबाद) येथे झाला. त्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आल्या असून, त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील हे माजी मंत्री होते. १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी विवाहानंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. काटेवाडी गावात ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ रोवत त्यांनी संपूर्ण गाव या मोहिमेत सहभागी करून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली काटेवाडी गावाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या कार्याची दखल देश-विदेशातील अभ्यासकांनी घेतली असून, सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधीही त्यांना मिळाली होती.
महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण तसेच ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून पर्यावरण विषयक जनजागृती असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदावर कार्यरत असताना त्यांनी हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
राजकीय वाटचालीतही सुनेत्रा पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. अजित पवार यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. शेतकाम, पशुपालन, पोल्ट्री व्यवसाय यामध्ये त्या प्रत्यक्ष सहभागी झाल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांनी जनसेवा सुरूच ठेवली. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आणि त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या. राज्यसभेतील कामकाजासोबत त्यांनी पक्षातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितल्यानंतर पवार कुटुंबात नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर पार्थ पवार यांनी बारामतीतील शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचा कोणताही निर्णय हा पक्षाचाच अंतर्गत निर्णय आहे. राष्ट्रवादीने जो निर्णय घेतला त्याला आमचा पाठिंबा असेल. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्याशी दोन वेळा चर्चा केली आहे, मात्र अंतिम निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच घेईल, असे त्यांनी सांगितले.
आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार असून, सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या राजकीय इतिहासात आपले नाव कोरणार आहेत. अजित पवार यांच्या निधनाच्या दुःखातून उभ्या राहून त्यांनी स्वीकारलेली ही जबाबदारी महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना राजकीय व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.








