रत्नागिरी, दि. ०२ : कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७९ कासवांची घरटी आढळून आली असून त्यातील १८ हजार ७३६ अंड्यांचे यशस्वीरीत्या संरक्षण करण्यात आले आहे. या अंड्यांतून बाहेर पडलेली ६६ पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
विशेष म्हणजे गुहागर येथील किनाऱ्यावर यापूर्वी टॅगिंग (खूण करणे) करण्यात आलेली चार कासवे यंदाच्या हंगामात पुन्हा अंडी घालण्यासाठी परतल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कासवे आपल्याच मूळ जन्मस्थळी परत येऊन अंडी घालतात, हा वैज्ञानिक निष्कर्ष पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ही बाब कासव संवर्धन मोहिमेसाठी मोठे यश मानले जात आहे.
सध्या जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून हे वातावरण कासवांच्या विणीसाठी अत्यंत पोषक मानले जाते. यंदा कासव विणीचा हंगाम काहीसा लांबला असला तरी सध्या ज्या प्रमाणात कासवे किनाऱ्यांकडे येत आहेत, ते पाहता फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर अंड्यांचे संवर्धन होईल, असा अंदाज वन विभाग व कासव मित्र संस्थांनी व्यक्त केला आहे.
कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी टॅगिंग पद्धतीचा वापर केला जातो. गुहागर किनाऱ्यावर यापूर्वी टॅग लावलेली चार कासवे पुन्हा अंडी घालण्यासाठी परतल्याने कासवांची स्थलांतर सवय आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाशी असलेली नाळ अधिक ठळकपणे समोर आली आहे. एकदा अंडी घालून गेलेली कासवे पुढील हंगामात त्याच किनाऱ्यावर येतात, हे निरीक्षण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर संवर्धन मोहीम सुरू असली तरी त्यातील काही ठिकाणी अद्याप एकही घरटे आढळलेले नाही. गुहागरमधील एका ठिकाणासह तवसाळ, ढोकमळे, जैतापूर, पूर्णगड, आडे, कर्दे, काळबादेवी आणि भाट्ये या किनाऱ्यांवर अद्याप घरटी आढळलेली नाहीत. त्यामुळे पुढील दोन महिने या किनाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक ‘कासव मित्र’ संस्था रात्रंदिवस गस्त घालत असून, कासवांची घरटी कुत्रे, कोल्हे व इतर भक्षकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. घरटी आढळताच ती संरक्षित ठिकाणी हलवून त्यावर जाळी लावून सुरक्षित ठेवली जात आहेत.
कासव संवर्धन मोहिमेमुळे जिल्ह्यातील जैवविविधतेचे संरक्षण होत असून, भविष्यात समुद्री पर्यावरण संतुलन राखण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. नागरिकांनीही किनाऱ्यावर कासव किंवा त्यांची घरटी आढळल्यास त्वरित वन विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.